बाळेकुंद्री / वार्ताहर
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीएसएफ, सीआरपीएफ व मारिहाळ पोलीस ठाण्याच्यावतीने मारिहाळचे सीपीआय चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली मारिहाळ पोलीस ठाणे हद्दीतील बाळेकुंद्री, सुळेभावी आदी गावांतील प्रमुख मार्गांवरून शनिवारी बीएसएफ जवान व पोलिसांच्या तुकडीने पथसंचलन केले. बेळगाव ग्रामीण मतदार संघात निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासह बंदोबस्तासाठी बीएसएफ, सीआरपीएफच्या दीडशेहून अधिक जवानांची तुकडी चार दिवसांपूर्वी दाखल झाली आहे. अतिसंवेदनशील भागात तसेच हद्दीतील प्रमुख गावांच्या मार्गांवरून त्यांनी पथसंचलन केल्याचे सांगून या काळात शांतता बिघडू नये यासाठी ही तुकडी तैनात केली आहे. सध्या असणारे पोलीस कर्मचारी विविध नाक्यांवर तैनात करण्यात आल्याचे सीपीआय चंद्रशेखर यांनी सांगितले.