मुचंडी येथील वृध्दाच्या खुनाचा गुंता कायम
प्रतिनिधी/ बेळगाव
चोर समजून केलेल्या मारहाणीत मुचंडी (ता. बेळगाव) येथील एका वृध्दाचा मृत्यू झाला होता. शनिवारी रात्री खनगाव बी.के. येथे ही घटना घडली होती. पोलीस अधिकारी ग्राम पंचायत निवडणूक बंदोबस्तात गुंतल्याने यासह अशा अनेक खून प्रकरणांचा तपास रखडला आहे.
आनंद मारुती कोलकार (वय 59, रा. मुचंडी) या वृध्दाचा मारहाणीत मृत्यू झाला होता. आनंद यांची पत्नी महादेवी यांनी मारिहाळ पोलीस स्थानकात खनगाव बी. के. येथील बाळकृष्ण बिळकी व त्यांच्या कुटुंबियांवर फिर्याद दाखल केली असून पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर पुढील तपास करीत आहेत.
सोमवारी वृध्दाच्या खुनाला तीन दिवस पूर्ण झाले. या प्रकरणाचा तपास कोठेपर्यंत पोहोचला याची माहिती घेण्यासाठी तरुण भारतने मारिहाळ पोलिसांशी संपर्क साधला असता आम्ही ग्राम पंचायत निवडणूक बंदोबस्तात आहोत. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात कसलीच प्रगती झाली नाही, असे अधिकाऱयांनी सांगितले. त्यामुळे खुनाचा गुंताही वाढला आहे.