बागलकोट जिल्हय़ातून पोलीस मागविले
प्रतिनिधी /बेळगाव
शुक्रवार दि. 3 सप्टेंबर रोजी होणाऱया महानगरपालिका निवडणुकीसाठी पोलीस दलाने बंदोबस्ताची तयारी पूर्ण केली आहे. यासाठी अतिरिक्त कुमक मागविण्यात आली असून शेजारच्या बागलकोट जिल्हय़ातूनही पोलीस बळ दाखल झाले आहे. बुधवारी बंदोबस्तावरील पोलिसांना मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक बंदोबस्ताची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. बेळगाव शहर व उपनगरांमध्ये सध्या उपलब्ध बळ पूर्ण प्रमाणात निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे. याबरोबरच अतिरिक्त कुमकही मागविण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्याशी संपर्क साधला असता राज्य राखीव दलाच्या 6 तुकडय़ा, गृहरक्षक दलाचे 300 जवान व बागलकोट जिल्हय़ातून 75 अतिरिक्त पोलिसांना बंदोबस्तासाठी जुंपण्यात आले आहे. याबरोबरच पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातही सर्व अधिकारी व पोलिसांना निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.
शुक्रवारी मतदान होणार आहे. गुरुवारी वेगवेगळय़ा मतदान केंद्रांवर पोलीस बळ पाठविण्यात येणार आहे. संवेदनशील व अतिसंवेदनशील भागांसह बहुतेक शहर व उपनगरांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांनी पथसंचलनही केले आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी काळय़ा यादीतील गुन्हेगारांची परेड घेऊन त्यांना तंबी देण्यात आली आहे.
कोणत्याही परिस्थितीत निवडणूक प्रक्रियेला धक्का पोहोचू नये यासाठी पोलीस दलाने सर्व तयारी केली आहे. बंदोबस्तासाठी आवश्यक अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे. अधिकाऱयांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी दिली.