नववर्षाबरोबरच आले निवडणूक वर्ष : चर्चमध्ये घंटानादाने नवर्षास प्रारंभ.कोरोनाची धास्ती असूनही पर्यटकांची गर्दी
प्रतिनिधी /पणजी
रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी वीज दिवे बंद झाले आणि पुढील 58 सेकंदानंतर पुन्हा दिवे सुरु झाले. घडय़ाळात त्यावेळी 00ः00ः00 शून्य वाजून शून्य मिनिट आणि शून्य सेकंद अशी स्थिती झाली आणि पुन्हा वीज दिवे सुरु झाले. इ. स. 2021 ला निरोप देऊन गोमंतकीय जनतेने असंख्य देश विदेशांतून आलेल्या पाहुणे मंडळींसोबत इ.स. 2022 वर्षाचे जोरदार स्वागत केले. गोमंतकीय जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचे वर्ष असून गोव्याच्या भवितव्याचा विचार करुन आपले बहुमुल्य असे मतदान करायचे आहे. 2022 हे निवडणूक वर्ष असून गोव्यातील जनतेला आपल्या व राज्याच्या हिताचा विचार करुनच महत्त्वाचा फैसला करायचा आहे.
नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पर्यटक गोव्यात पोहोचले, मात्र वार्षिक पद्धतीप्रमाणे यावर्षी तोबा गर्दी नव्हती. हॉटेलांच्या बाहेर लागणाऱया रांगा गायब झाल्या होत्या. वार्षिक ओव्हरफ्लो होणारी हॉटेल्स पुन्हा मर्यादित स्वरुपातील गर्दीत चालली. कोविडच्या तिसऱया लाटेने डोके वर काढले आहे. गोव्यातही कोरोना बाधितांच्या संख्येने एक सहस्त्रक पूर्ण केले आहे. वातावरण किंचित तणावाचे असले तरीदेखील नागरिकांमध्ये उत्साह कमी नव्हता.
जे पर्यटक देशाच्या विविध भागांतून आलेले ते मौज मस्ती करीत समुद्रकिनारी एँजॉय करीत होते. हॉटेलांच्या खोल्यांचे दर तिप्पट, चौपटीने होत असे. यंदा मूळ दराला देखील भाडय़ाने देणे कठीण झालेले. तरीदेखील नववर्षाचे स्वागत किनारपट्टीच्या भागात प्रचंड जल्लोषात व उत्साहात साजरे करण्यात आले.
चर्चमध्ये घंटानादाने नववर्षाचे स्वागत
इंग्रजी कॅलेंडर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर जगात सर्वत्र स्वीकारण्यात आलेले आहे. मध्यरात्रीच्या वेळी पणजीसह राज्यातील बहुतांश चर्चमध्ये उशिरापर्यंत प्रार्थना चालल्या व 11 वा. 59 मिनिटांनी चर्चमधील दिवे गेले व 58 सेकंदानंतर पुन्हा दिवे सुरु झाले. चर्चच्या फादर्सनी इ. स. 2022 मध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले. चर्चवरील घंटानाद सुरु झाला. चर्चच्या पटांगणात फटाक्यांची आतषबाजी झाली. सर्व भक्तगणांनी जोरदार टाळ्य़ा वाजवून व एकमेकांना शुभेच्छा देत नूतन वर्षाभिनंदन केले.
कोरोनावर्षानंतर आले निवडणूक वर्ष
कोविडच्या तिसऱया लाटेची धास्ती अनेकांनी घेतली खरी परंतु 2022 या गोव्यातील निवडणूक वर्षाचे स्वागत सर्वांनीच जोरदारपणे केले. राजकीय नेत्यांनीही विविध सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम प्रायोजित केले होते. बहुतांश नेत्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना आपापल्या मतदारसंघात हजेरी लावली. 2021 वर्ष हे भयाण पद्धतीने गेले. संघर्षमय गेले. 2022 कडे मोठय़ा उत्साहाने पाहायचे आहे. गोव्यासह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत व जानेवारीच्या पहिल्याच आठवडय़ात निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात येणार आहे. उत्सुकता ताणली जाणार आहे.
नेत्यांसह जनतेलाही निवडणुकीचे वेध
गोव्यातील साऱया जनतेचे लक्ष आता निवडणुकीकडे आहे. निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. केवळ आता तारखा जाहीर होण्याची प्रतीक्षा. कोण कोणत्या पक्षात असतील, जातील, राहातील हे ठरत नाही. राजकीय नेत्यांनी गोंधळ घालून दिलेला आहे. गोव्याच्या राजकारणात वाढत्या माकडउडय़ा ही चिंतेची बाब ठरलेली आहे. त्यामुळे जनतेला कोणाबरोबर राहायचे? हाच गहन प्रश्न पडलेला आहे.
सद्यस्थितीत कोणत्याही राजकीय पक्षावर व नेत्यांवर विश्वास ठेवण्यासारखी स्थितीच राहिलेली नाही. गोमंतकीय जनता अजीब है! असे पं. जवाहरलाल नेहरु यांनी म्हटले होते त्याचे अनुभव आपण गेल्या 60 वर्षात घेतले. गोवा 60 वर्षांचा झाला. गोव्याचे राजकारण 58 वर्षांचे झाले. तरीदेखील गोव्याचे राजकारण परिपक्व झालेले नाही. त्यामुळेच नेते मंडळी विविध पक्षात उडय़ा मारीत आहेत.
नव्या वर्षात निवडणुकीचा ‘काऊंट डाऊन’ सुरु
नूतन वर्षाला प्रारंभ झाला आहे आणि आता जनतेला आपला हक्क बजावयाचा आहे. जनतेतील प्रत्येक 18 वर्षांवरील घटक हे मतदारराजा बनणार आहेत. गोमंतकाचे भवितव्य लक्षात घेऊन त्या दृष्टिकोनातून नागरिकांना आपला हक्क बजावयाचा आहे. गोव्यात इ. स. 2022 च्या नूतन तसेच निवडणूक वर्षाचे जोरदार स्वागत झालेले आहे. निवडणुका जाहीर होण्याच्या कार्यक्रमाचा काउंटडाउन सुरु झालेला आहे. केवळ आणखी 4 दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल.
निवडणुकीसंबंधी भाजपची धोरणात्मक चर्चा : केंद्रीय मंत्र्यांसह, स्थानिक मंत्री, आमदार, पदाधिकाऱयांची उपस्थिती
येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या निवडणूक समितीसह प्रमुख पदाधिकाऱयांच्या झालेल्या बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने निवडणूक धोरणावर विशेष चर्चा झाली, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
बैठकीस त्यांच्यासह निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किशन रेड्डी, श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, गोवा प्रभारी सी टी रवी, संघटनमंत्री सतीश धोंड आदींची उपस्थिती होती.
कोरोना एसओपीचे सखोल पालन करा
राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे मार्गदर्शक तत्वांचे सखोल पालन करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना करण्यात आल्या आहेत. कोरोना नेगेटिव्ह प्रमाणपत्र, लसीकरण प्रमाणपत्र. कोरोनासंबंधी नियमावली दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱयांनी जारी केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे सांखळीतून प्रचारकार्य सुरू
दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या सांखळी मतदारसंघातून प्रचारकार्य प्रारंभ केले. त्याची सुरूवात त्यांनी कोठंबी पाळी येथील देव चंद्रेश्वर मंदिरात नारळ ठेऊन केली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, सरचिटणीस नरेंद्र सावईकर, यांच्यासह मतदारांचीही लक्षणीय उपस्थिती होती. त्यामुळे सांखळी मतदारसंघात पुन्हा एकदा मोठय़ा मताधिक्क्याने विजयी होण्याची खात्री मुख्यमंत्र्यानी व्यक्त केली.
त्यावेळी बोलताना गत दहा वर्षांपासून या मतदारसंघाचे आपण प्रतिनिधीत्व करत असून या काळात अनेक सकारात्मक कामे केलेली आहेत. त्यात साधनसुविधांसह जनतेच्या विकासाचाही समावेश आहे. त्यामुळे विरोधकांबद्दल काहीही बोलण्याची आवश्यकता नाही. लोकांनी केवळ 2012 पूर्वीचा काळ आणि आपल्या कारकीर्दीची दहा वर्षे यांची तुलना करावी, ’अच्छे दिन’ म्हणजे काय याचा त्यांनाच साक्षात्कार होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मतदारसंघात अनेक बदल घडलेले आहेत. लोकांचा आपणावर विश्वास, प्रेम, आपुलकी आहे. त्याच भावनेतून ते मतदान करतील, असे ते म्हणाले.