सहकार क्षेत्रातून विरोध : राज्य सरकारकडून कोरोनाचे कारण, आर्थिक व्यवहाराची कामे खोळंबली, संस्थांवर प्रशासक नेमणे सहकारी तत्त्वाच्या विरुद्ध
प्रतिनिधी /बेंगळूर
कोरोनाचे कारण देत सहकारी सोसायटी, संघ-संस्थांच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याला सहकार क्षेत्रातून तीव्र विरोध व्यक्त होत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे या संस्थांची दैनंदिन कामे, प्रशासकीय कामे, विकासकामे आणि आर्थिक व्यवहाराची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे हा आदेश मागे घेण्याची मागणी होत आहे.
कोरोना परिस्थितीत सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येऊ नये, असा निर्णय सरकारने घेतला आहे. या आदेशाचा आधार घेत सहकारी संस्थांच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवडही सरकारने रोखून धरली आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी संबंधित संस्थांचे संचालक इतकेच एकत्र येण्याची शक्मयता असते. येथे कोणीही गटाने जमत नाही. हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक एकत्र येणार असल्यामुळे कोरोना नियमांचे कोणतेही उल्लंघन होत नाही, असे मत सहकारी संस्थांचे नेते व्यक्त करीत आहेत.
भ्रष्टाचार होण्याची शक्यता
सहकारी तत्त्वानुसार विकासासाठी धडपडत असलेल्या संस्थांवर प्रशासक नेमणे हे सहकारी तत्त्वाच्या विरुद्ध आहे. प्रशासक नेमल्यामुळे भ्रष्टाचार होण्याची शक्मयता असते. शिवाय ते लोकांच्या हितासाठी कार्य करेलच असे नाही. त्यामुळे प्रशासक नियुक्तीला जास्तीत जास्त टाळण्यात यावे. मुदत संपताच निवडणुका घेण्याची तरतूद सहकार कायद्यात आहे. तसेच गरज भासल्यास कायद्यात दुरुस्ती करून सध्या असलेले संचालक मंडळास पुढे मुदतवाढ देण्यात यावी किंवा निवडणूक घ्यावी. यापैकी कोणतेही एक पाऊल सरकाने उचलावे. सहकार क्षेत्राशी संबंधित निवडणुका पुढे ढकलण्याबाबत घेण्यात आलेला निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे.
पीक कर्जास अडचण
अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक पुढे ढकलल्यामुळे ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक कृषी पतसंस्थांना शेतकऱयांचे पीककर्ज देणे, कर्जाची पत निश्चित करणे यावर निर्णय घेणे अवघड जात आहे. तसेच दर महिन्याला घेण्यात येणारी विकास आढावा बैठकही शक्मय होत नाही. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
स्थानिकांच्या विकासासाठी ‘सहकार’चे मोठे योगदान
सहकार विभागांतर्गत राज्यात 37,516 सहकारी संस्था आहेत. यामध्ये स्थानिक सहकारी संघ, सहकारी बँक, गृहनिर्माण सहकारी संघ, महिला श्रेय अभिवृद्धी संस्था, प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ किंवा बँक, डीसीसी, परिवहन, बांधकाम कामगार, दूग्ध व्यवसाय, सहकारी रुग्णालय, विणकर, नाभिक, पाणीपुरवठा संघ, दूध डेअरी, सहकारी साखर कारखाना यासह विविध संस्थांचा समावेश होतो. या संस्था सध्या कार्यक्षमतेने कार्य करीत आहेत. स्थानिक लोकांच्या विकासासाठी सहकार क्षेत्राने मोठे योगदान दिले आहे.