राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर. स्वाती,दिशा, भाग्यश्री करणार प्रतिनिधित्व
औंध / प्रतिनिधी
अमेठी उत्तरप्रदेश येथे 16 ते 21 सप्टेंबर अखेर होणाऱ्या २३ वर्षाखालील तिसऱ्या फ्रीस्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी आज दि. 5 सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत कोल्हापूरच्या महिला कुस्तीगीरांनी पाच वजनगटात बाजी मारली आहे. निवड चाचणीतून मुलींचा संघ जाहीर करण्यात आला. आंतरराष्ट्रीय मल्ल स्वाती शिंदे, दिशा कारंडे, भाग्यश्री फंड महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत.
इंदापूर, जि. पुणे येथील स्व. रंगनाथ मारकड कुस्ती केंद्रात सकाळी निवड चाचणीला सुरवात झाली. 178 महिला पैलवान विविध वजनगटातून चाचणीच्या आखाड्यात उतरल्या होत्या. अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीत कोल्हापूर जिल्ह्यातील महिला मल्लांनी प्रतिस्पर्धी मल्लांना आस्मान दाखवून स्पर्धेत कुस्तीपंढरीचा दबदबा निर्माण केला.
निवड चाचणी स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
५० किलो कीर्ती गुडलेकर ( धुळे ), ५३ किलो स्वाती शिंदे( कोल्हापूर ),५५ किलो विश्रांती पाटील (कोल्हापूर ),५७ किलो दिशा कारंडे( कोल्हापूर ),५९ किलो भाग्यश्री फंड ( अ . नगर ),६२ किलो सोनाली मंडलिक (अ . नगर ), ६५ किलो सृष्टी भोसले(कोल्हापूर ), ६८ किलो वेदान्तिका पवार ( कोल्हापूर ),७२ किलो सानिका पवार (बीड ),७६ किलो प्रतीक्षा बागडी ( सांगली ), यशस्वी मल्लांचे प्रशिक्षक, कुस्तीशौकिन,पालक आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.