दिल्ली गाठण्यासाठी काट्याची टक्कर
फिरोज मुलाणी / सातारा :
उत्तरप्रदेश (नंदीनीनगर) येथे होणाऱ्या फ्रीस्टाईल वरीष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी उद्या गुरुवारी सातारला महाराष्ट्र संघाची निवड चाचणी होणार आहे. निवड चाचणीच्या आखाड्यात महाराष्ट्र केसरीसह जागतिक पदक विजेते मल्ल दिल्लीचे तख्त गाठण्यासाठी उतरणार असल्याने उद्या होणारी निवड चाचणी म्हणजे महाराष्ट्र केसरीची रंगीत तालीमच ठरणार आहे. अनेकांच्या नजरा आजच्या स्पर्धेकडे लागल्या आहेत.
सातारच्या बीव्हीजी मेघा फूड पार्क येथे गेली दोन दिवस महिला फ्रीस्टाईल आणि पुरुष ग्रीकोरोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे घमासान सुरू आहे. सलग दोन दिवस कुस्ती स्पर्धा सुरू असल्याने कुस्तीचा आखाडा तापला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंच्या नेत्रदीपक कुस्त्याचा थरार पहायला मिळाल्याने कुस्तीशौकीनांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने दोन राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा सातारला देताना राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणी देखील साताऱ्यात घेऊन जणू आँलम्पिकवीरांच्या जन्मभूमीचा सन्मान करण्यासाठी बोनस स्पर्धा दिली आहे.
राष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेते अव्वल दर्जाचे मल्ल सहभागी होणार असल्याने या स्पर्धेची रंगत आणखीनच वाढणार आहे. 125 किलो वजनगटातून ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी जळगाव, सोलापूरचा अक्षय मंगवडे, पुण्याचा शिवराज राक्षे, मुन्ना झुंझुरके कोल्हापूर येथील शुभम शिदनाळे सहभागी होणार आहेत. विद्यापीठ स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात मुन्ना, अक्षय, शिवराज शिदनाळे यांची कामगिरी लक्षणीय ठरली आहे. ट्रीपल महाराष्ट्र केसरी कसलेल्या विजय चौधरीचे कडवे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे.
97 किलोगटात देखील महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, सोलापूरचा गणेश जगताप पुण्याचा सागर मोहोळ अक्षय भोसले, शंकर चौगुले झुंजणार आहेत. अर्जुनवीर काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारे महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन आणि गणेश जगताप आज एकाच गटात समोरासमोर उभे ठाकणार आहेत.
92 किलोमध्ये कुस्तीपंढरीतील आंतरराष्ट्रीय मल्ल पृथ्वीराज पाटील, आणि संग्राम पाटील भिडणार आहेत. सोलापूरचा आंतरराष्ट्रीय पैलवान दादा वेताळला रोखण्यासाठी 86 किलो वजनगटातील मल्लाना ताकद पणाला लावावी लागणार आहे.74 किलो गटात जागतिक पदक विजेता नरसिंग यादव, राष्ट्रीय विजेता राकेश तांबुळकर, आणि सांगलीचा अतुल नायकल यांच्यातील चुरशीचा मुकाबला पहायला मिळणार आहे. 61 किलोत जागतिक पदक विजेता राहुल आवारे, सोनबा गोंगाणे, सुरज कोकाटे यांचा कस लागणार आहे.
तर 57 किलोगटात सोलापूरचा जोतिबा अटकळे, बीडचा आतिश तोडकर, कोल्हापूरचे विजय पाटील, रमेश इंगवले यांच्यातील अटीतटीच्या लढतीचा थरार कुस्तीशौकीनांना पहायला मिळणार आहे. 79 किलो गटातील समीर शेखचे आव्हान प्रतिस्पर्ध्याला पेलावे लागणार आहे.
97 आणि 125 किलो वजनगटातील मल्ल गेल्या वेळी महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात परस्परांशी भिडले होते. पुढील महिन्यात महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होणार आहे राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी निवड चाचणीच्या आखाड्यात राज्यातील दिग्गज मल्ल परस्परांशी भिडणार असल्याने आजची निवड चाचणी ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची रंगीत तालीम मानली जात आहे.
तीन डीवायएसपी आज आखाड्यात..
राष्ट्रीय निवड चाचणीसाठी जागतिक पदक विजेता डीवायएसपी राहुल आवारे,जागतिक पदक विजेता डीवायएसपी नरसिंग यादव, ट्रीपल महाराष्ट्र केसरी डीवायएसपी विजय चौधरी आज राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणाऱ्या निवड चाचणीसाठी आखाड्यात उतरणार आहेत. सर्वांनाच त्यांच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे.
भाग्यपत्रिकेवर बरेच अवलंबून…
उद्याच्या फ्रीस्टाईल प्रकारात 57, 61, 65, 65, 70, 74, 79, 86, 92, 97, 125 किलो वजनगटात लढती होणार आहे. स्पर्धेची भाग्यपत्रिका (लॉट) सकाळी काढण्यात येणार आहे. भाग्यपत्रिकेवरच अनेक गटातील लढतीचे निकाल स्पष्ट होणार आहेत.