शिवसेना विभागप्रमुख पेडणेकर यांची चौकशीची मागणी
घनकचरा व्यवस्थापनाची पत्राशेड उभारण्याचे चार लाखाचे काम
प्रतिनिधी / देवगड:
देवगड-जामसंडे नगरपंचायतीमार्फत घनकचरा व्यवस्थापनासाठी सुमारे चार लाख रुपये खर्चाची पत्राशेड उभारणीची निविदा काढण्यात आली आहे. मात्र, निविदा काढण्यापूर्वीच पत्राशेड उभारण्यात आली आहे. या कामात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार असून याची सात दिवसांत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना विभागप्रमुख तुषार उर्फ पीटी पेडणेकर यांनी मुख्याधिकाऱयांकडे केली आहे.
पेडणेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 5 ऑगस्टच्या एका साप्ताहिकामध्ये देवगड जामसंडे नगरपंचायतीमार्फत निविदा सूचना क्र. 07/2021-22 ठेकेदारांकडून सिलबंद निविदा मागविण्यात आली आहे. यामध्ये देवगड जामसंडे नगरपंचायत क्षेत्रातील नवीन जागेमध्ये व्यवस्थापनेसाठी पत्रा शेड उभारणेसाठी अंदाजपत्रकीय रक्कम एक लाख 99 हजार 991 रुपये व देवगड जामसडे नगरपंचायत क्षेत्रातील नवीन जागेमध्ये घनकचरा यंत्रसामग्री बसविणे पत्राशेड उभारणे अंदाजपत्रकीय रक्कम एक लाख 99 हजार 935 रुपये अशी निविदा असणारी जाहिरात देण्यात आली आहे. मात्र, देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीमध्ये कट्टा या ठिकाणी निविदा निघण्याअगोदर दोन पत्राशेडचे बांधकाम केल्याचे आढळून येत आहे. प्रत्यक्षरित्या जागेवर आजच्या स्थितीला शेडचे बांधकाम पूर्ण झाल्याचे फोटोसह पुरावे आमच्याकडे आहेत. निविदा काढण्यात येणाऱया कामाचे बांधकाम प्रथम पूर्ण करून नंतर निविदा काढण्याचा सोपस्कार नगरपंचायतीने केला आहे. हे देवगड जामसंडे नरपंचायतच्या कुठल्या नियमात बसते, याचा खुलासा मुख्याधिकाऱयांनी करावा. शिवसेनेच्या माध्यमातून वारंवार नगरपंचायतीच्या कामांबाबत पोलखोल करूनही नगरपंचायतच्या कारभारामध्ये सुधारणा झालेली नाही.
निविदा क्र. दोनच्या कामामध्ये देवगड जामसंडे नगरपंचायत क्षेत्रातील नवीन जागेमध्ये घनकचरा यंत्रसामग्री बसविण्याकरिता पत्राशेड उभारणे व निविदा क्र. 1 च्या कामामध्ये सुक्मया कचऱयासाठी पत्राशेड उभारणे म्हणजे नक्की काय ? यंत्रसामग्री नक्की कोण बसविणार? या निविदा प्रक्रियामध्ये भ्रष्टाचार निव्वळ भ्रष्टाचार आहे. या कामांबाबत ठराव कुठल्या मासिक सभेत घेण्यात आला. तसेच या कामाकरिता कुठल्या फंडातून किती निधी खर्च करण्यात यावा, या बाबतचा ठराव झाला आहे का? ज्या जागेवर बांधकाम करणार त्या ठिकाणी आजच्या स्थितीला पत्राशेड बांधकाम पूर्ण झालेले आहे. हे बांधकाम करणारा ठेकेदार कोण ? निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदरच या ठेकेदाराला कोणत्या नियमात नगरपंचायतने बांधकाम करण्यास सांगीतले? हा ठेकेदार नगरपंचायतकडून पैसे न घेता जर दानशूर वृत्तीने पत्राशेड बांधकाम करून देत असेल तर नगरपंचायत बांधकाम झाल्यानंतर निविदा प्रक्रिया कशाला? असे सवालही पेडणेकर यांनी केले आहेत. या निविदा प्रक्रियेला शिवसेनेचा तीव्र विरोध असून जिल्हाधिकाऱयांकडे याबाबतची सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.