वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नोएडा येथे एका निवृत्त आयपीएस अधिकाऱयाच्या घरामध्ये बेकायदा लॉकर्स आणि रक्कम दडवल्याची माहिती मिळाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईमध्ये मोठे घबाड सापडले आहे. या घराच्या बेसमेंटमध्ये 650 लॉकर्स आढळले असून त्यातही मोठय़ा प्रमाणात रक्कम आहे. आतापर्यंत 3 कोटींची रोकड मिळाली असून अद्यापही तेथे तपासणी सुरु आहे.
दरम्यान, या अधिकाऱयाने आपला मुलगा लॉकर्स भाडय़ाने देण्याचा व्यवसाय करत असल्याचे म्हटले आहे. सापडलेली रक्कम आपली नसून त्याचे अन्य मालक असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी काहीजण अडकण्याचीही शक्यता प्राप्तिकरच्या अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे.
प्राप्तिकरच्या अधिकाऱयांनी या छापेमारीत आतापर्यंत खासगी बेनामी लॉकरमधून 3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. घराच्या तळघरात बांधलेल्या या खासगी लॉकर्सपैकी एका लॉकरमध्ये सुमारे दोन कोटी रुपये आणि उर्वरित दोन लॉकरमधील 30 ते 35 लाख रुपये जप्त केले आहेत. हे तिन्ही लॉकर सोमवारी रात्री उशिरा तोडण्यात आले असून, आणखी दोन संशयास्पद लॉकर लवकरच फोडले जाण्याची शक्यता आहे.
नोएडा सेक्टर-50 येथील या घरात आर. एन. सिंह यांचा मुलगा सुयश आणि त्याचे कुटुंबीय राहतात. माजी आयपीएस अधिकारी आणि त्यांची पत्नी मिर्झापूर येथे राहतात. प्राप्तिकर विभागाच्या पथकाने आर. एन. सिंह यांच्या घरात मोठय़ा प्रमाणात रोकड ठेवल्याच्या माहितीच्या आधारे शनिवारी छापा टाकला होता.
जेव्हा प्राप्तिकर पथक घराच्या आत पोहोचले तेव्हा तळघरात सुमारे 600 खासगी लॉकर सापडले. हे लॉकर्स इतर लोकांचे असल्याचे सांगितले जात आहे. हे लॉकर्स इतरांना भाडय़ाने देण्यात आले होते. प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी त्या लोकांशी संपर्क साधला, परंतु ते पुढे येण्यास टाळाटाळ करत आहेत. प्राप्तिकर विभागाचा तपास आता बेनामी लॉकरकडे सरकला आहे. जप्त केलेली रक्कम सरकारी खात्यात जमा केली जाईल, असे सांगण्यात आले.
आर. एन. सिंग म्हणाले, माझा मुलगा लॉकर भाडय़ाने देतो, बँकांपेक्षा जास्त सुविधा देतो, यामध्ये आमच्याकडे दोन लॉकर्स खासगी आहेत, आमच्याकडे सर्व तपशील आहेत. घरातील काही दागिने टीमला मिळाले आहेत. तसेच लॉकर्समध्ये जे काही सापडले आहे त्याची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत, असे स्पष्टीकरण दिले आहे. या अधिकाऱयाच्या पत्नीच्या नावावर खासगी लॉकर भाडय़ाने देण्याचे काम केले जात असल्याचे सांगण्यात आले. हा वडिलोपार्जित व्यवसाय असल्याचा दावाही त्यांनी केला असून तपासात सर्व सहकार्य देत असल्याचे स्पष्ट केले आहे.