प्रतिनिधी/ बेळगाव
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. कधी एटीएम बंद झाल्याचे सांगून तर आणखी कधी तुम्हाला मोठय़ा रकमेचे बक्षीस लागल्याचे सांगून बँक खात्यातील रक्कम हडप केली जाते. कंग्राळी खुर्द येथील एका निवृत्त कर्मचाऱयाच्या बँक खात्यातून एका दिवसात 10 लाख रुपये हडप करण्यात आले आहेत. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
सीईएन पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर पुढील तपास करीत आहेत. एका दिवसात तब्बल 102 वेळा ओटीपी क्रमांक शेअर केल्यामुळे ही फसवणूक झाली असून बँक खात्याचे केवायसी अपडेट करायचे आहे असे सांगत भामटय़ांनी हा गंडा घातला आहे.
यासंबंधी कंग्राळी खुर्द येथील यल्लाप्पा नारायण जाधव यांनी सीईएन (सायबर एकॉनॉमिक्स व नॉर्कोटिक्स) पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. 9 जून रोजी ही घटना घडली असून केवळ एका दिवसात तब्बल 102 वेळा ओटीपी क्रमांक शेअर करायला भाग पाडून भामटय़ांनी त्यांच्या बँक खात्यातील रक्कम हडप केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार गेल्या बुधवार दि. 9 जून रोजी सकाळी 09339281627 या मोबाईल क्रमांकावरुन यल्लाप्पा जाधव यांना कॉल आला. तुमच्या बँक खात्याचे केवायसी अपडेट करायचा आहे. त्यामुळे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे द्या, असे भामटय़ांनी सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून एसबीआय मधील आपल्या अकाऊंटसंबंधीची माहिती त्यांनी पाठविली.
आधारकार्ड, पासबुक झेरॉक्स व्हॉट्सऍपच्या माध्यमातून पाठविण्यात आले. त्यानंतर भामटय़ांकडून लिंक आले. ओटीपी क्रमांक पाठविण्यास सांगण्यात आले. त्यांच्या सांगण्यावरुन यल्लाप्पा यांनी तब्बल 102 वेळा त्यांना ओटीपी शेअर केले. त्यावेळी त्यांच्या खात्यातील दहा लाख रुपये गायब झाल्याचे बँकेकडून आलेल्या मॅसेजवरुन निदर्शनास येताच त्यांना मोठा धक्का बसला. यल्लाप्पा हे बीएसएनएलचे निवृत्त कर्मचारी आहेत.
सायबर क्राईमचे प्रकार वाढले
सायबर क्राईमचे प्रकार वाढले आहेत. ओटीपी घेऊन बँक खात्यातील रक्कम हडप करण्यातील गुन्हेगार परप्रांतिय आहेत. नवी दिल्ली, नोयडा, झारखंड परिसरात या गुन्हेगारांचे वास्तव्य आहे. गेल्या आठवडय़ात अशाप्रकारे हडप केलेले कोटय़वधी रुपये बेंगळूर पोलिसांनी जप्त केले होते. बँक खात्यातून रक्कम गायब झाल्यानंतर तासाभरात जर सायबर क्राईम विभागाला त्याची माहिती मिळाली तर भामटय़ांची बँक खाती गोठविता येतात. मात्र आपण फसलो याची जाणिव होईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तोपर्यंत भामटय़ांनी आपल्या खात्यातून रक्कम दुसरीकडे वळविलेली असते.