प्रतिनिधी/कोल्हापूर
नव्वदच्या दशकात कोल्हापूरमध्ये लोकअदालत सुरू करण्यासाठी पुढाकार घेणारे सेवा निवृत्त गटविकास अधिकारी कृष्णराव तुकाराम तथा के. टी. भोसले (वय 97, रा. भोसलेवाडी-कदमवाडी) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, पुतणे, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सतीश भोसले यांचे ते वडील तर सॉफ्टवेअर कन्सल्टंट अजय नरके यांचे ते सासरे होत.
दीर्घायुष्य लाभलेल्या के. टी. भोसले यांनी प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शालेय तर राजाराम महाविद्यालयात बीए पदवीचे शिक्षण घेतले. बीएड केल्यानंतर 1955 मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून काही काळ सेवा बजावली. एस.ई.ओ. म्हणून शासकीय सेवेला प्रारंभ केला. गटविकास अधिकारीपदी बढती मिळाल्यानंतर त्यांनी हातकणंगले, शाहूवाडी, भुदरगड तालुक्यात शेती, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास व सामाजिक विकासाची कामे केली. शेतकऱ्यांना उत्तम शेती कशी करावी, पाणी कसे द्यावे, बियाणे, खतांचा वापर कशा पद्धतीने करावा, याविषयी मार्गदर्शन केले. विशाळगडच्या विकासकार्यातही योगदान दिले. 1983 मध्ये निवृत्तीवेळी त्यांना शासनाने सहा महिने मुदतवाढ दिली होती. 1984 मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शाहू स्मारक भवनचे व्यवस्थापक म्हणूनही पाच वर्षे काम पाहिले. भोसलेवाडीत पहिला महिला बचत गट आणि पै. गणपतराव शिंदे व्यायामशाळा भोसले यांनी सुरू केली. समता हायस्कूलच्या उभारणीत त्यांचा वाटा होता.
कोल्हापूरमध्ये लोकअदालतीचा प्रारंभ आणि जबाबदारी
कोल्हापूरमध्ये लोकन्यायालय अर्थात लोक अदालत सुरू करण्यात के. टी. भोसले यांचा पुढाकार होता. 1993 मध्ये त्यांनी लोक अदालतीचे फिल्ड आŸफिसरपदाची जबाबदारी स्वीकारली. पुढे दहा वर्षे ते या पदावर कार्यरत होते. घटस्फोटासह कौटुंबीक असो वा इतर वाद, तंटे असोत ते लोकअदालतीच्या माध्यमातून न्यायालयाच्या बाहेर सामजस्याने सोडविण्यास मदत केली.