प्रतिनिधी/ उंब्रज
चोरे (ता. कराड) येथील सेवानिवृत्त एसआरपीएफ जवानाच्या पेन्शन खात्याचे एटीएम चोरुन खात्यातील 5 लाख 52 हजाराची रक्कम वेळोवेळी काढून फसवणूक केल्याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गोरखनाथ बंडू लोखंडे (वय 65, चोरे) यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत गोरखनाथ लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अधिक माहिती अशी की, गोरखनाथ लोखंडे हे सन 2013 साली एसआरपीएफ ग्रुप- 1 वडोदरा राज्य – गुजरात येथून सेवानिवृत्त झाले आहेत. तेव्हापासून ते चोरे येथे पत्नी सौ. मालन यांच्या सोबत राहतात. फिर्यादीस गुजरात सरकारची पेन्शन सुरू असून ती बँक ऑफ इंडिया बचत खात्यात दरमहा सुमारे 18 हजार रूपयांच्या आसपास जमा होते. दरम्यान, वय झाल्यामुळे त्यांनी घराच्या भिंतीवर एटीएम कार्डचा पिनकोड लिहिला होता. ते पेन्शन काढायला जाताना भाची सुरेखा उर्फ ताई अशोक पालवे (रा. पाडळोशी, ता. पाटण) यांचा मुलगा नितीन पालवे यास घेऊन जात होते. मात्र घरात गरजेपुरते पैसे असल्याने त्यांना लॉकडाऊनच्या काळात पैशांची आवश्यकता भासली नाही. लॉकडाऊन उठल्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी त्यांनी बँक ऑफ इंडियाचे पेन्शनचे पासबुक नोंदवून घेतले. पुस्तक भरल्यानंतर 1 जुलै ते 4 नोव्हेंबरमध्ये या कालावधीत वेळोवेळी सुमारे 5 लाख 52 हजार 270 रूपयांची रक्कम खात्यावरुन कोणीतरी काढल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी घरात ठेवलेले बँक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड पैशांच्या पाकिटात पाहिले असता ते पाकिटात नव्हते. त्यानंतर कोणीतरी एटीएम कार्ड चोरून नेऊन वेळोवेळी सुमारे 5 लाख 52 हजार 270 रूपयांची रक्कम काढून ती चोरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अज्ञात चोरटय़ाविरूध्द उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड करीत आहेत.