विंडीजचा महान फलंदाज ख्रिस गेलची स्पष्टोक्ती
दुबई / वृत्तसंस्था
वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ख्रिस गेलने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अद्याप निवृत्त झालेलो नाही, अशी स्पष्टोक्ती रविवारी दिली. घरच्या मैदानात, जमैकामध्ये समारोपाचा सामना खेळण्याची इच्छा आहे. त्यामुळे, आपण घरच्या चाहत्यांसमोरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीचा समारोप करु, असे हा दिग्गज फलंदाज म्हणाला.
यापूर्वी, शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-20 सामन्यात ख्रिस गेल फलंदाजीला उतरला, त्यावेळी खेळाडूंनी टाळय़ांच्या गजरात त्याचे स्वागत केले. नंतर बाद झाल्यानंतर ख्रिसने सर्व चाहत्यांना अभिवादन केले, तसेच चाहत्यांच्या दिशेने ग्लोव्हज फेकले. यामुळे ब्रेव्होप्रमाणेच गेलसुद्धा निवृत्त होईल, असे संकेत मिळाले. त्या पार्श्वभूमीवर गेलने हा खुलासा केला.
‘मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्या लढतीत फक्त खेळाचा आनंद लुटत होतो. जे काही झाले, ते बाजूला सारुन चाहत्यांना मी अभिवादन केले. माझा हा विश्वचषकातील शेवटचा सामना आहे, याची कल्पना असल्याने मी अभिवादन करत होतो’, असे त्याने आयसीसीच्या सामन्यानंतर आयोजित फेसबुक लाईव्ह शोमध्ये नमूद केले.
‘वास्तविक, मला आणखी एक विश्वचषक खेळायचा आहे. पण, ते मला संधी देतील, असे वाटत नाही. मी निवृत्ती जाहीर केलेली नाही. त्यांनी मला जमैकाच्या चाहत्यांसमोर खेळण्याची संधी द्यावी, अशी अपेक्षा असणार आहे. घरच्या चाहत्यांसमोर शेवटचा सामना खेळत मी सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो’, असे ख्रिस गेल तपशीलवार बोलताना म्हणाला. तब्बल 22 वर्षांच्या देदीप्यमान कारकिर्दीत ख्रिस गेलने 79 टी-20, 103 कसोटी व 301 वनडे सामने खेळले आहेत.
ख्रिस गेलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
क्रिकेट प्रकार / सामने / धावा / सर्वोच्च / शतके / अर्धशतके / विकेट्स
कसोटी / 103 / 7214 / 333 / 15 / 37 / 73
वनडे / 301 / 10480 / 215 / 25 / 54 / 167
टी-20 / 79 / 1899 / 117 / 2 / 14 / 20