पुणे / प्रतिनिधी :
शेती आणि शेळीपालन हे लेह-लडाखमधील उत्पन्नाचे एकमेव साधन होते आणि स्नोलेपर्ड ही डोकेदुखी ठरली होती. शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर स्नोलेपर्डने हल्ले करण्याचे प्रमाण खूप वाढल्याने स्नोलेपर्ड ही एक समस्या बनली होती. कालंतराने स्नोलेपर्डचे संवर्धन आणि पर्यटन याची योग्य सांगड घालत या समस्येवर तोडगा काढण्यात आला. आता खास स्नोलेपर्ड बघण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर इकडे येतात. यातून शेतीला पूरक अर्थव्यवस्था निर्माण करता आली. निसर्गाकडे आपण कसे पाहतो, त्यावर आपले यश अवलंबून आहे, असे मत लेह-लडाख येथील ‘शान-ए-शान’ अर्थात स्नोलेपर्डचे संवर्धन करणारे कार्यकर्ते खेनरब फुन्तसोग, ताशी त्सेरींग आणि स्मानला त्सेरींग ( Khenrab Phuntsog, Tashi Tsering, Smanla Tsering) यांनी व्यक्त केले.
१४ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त यंदाच्या वसुंधरा मित्र पुरस्काराचे मानकरी लेह-लडाखचे ‘शान-ए-शान’ यांच्या विशेष वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सुप्रिया चित्राव उपस्थित होत्या.
ते म्हणाले की, लेह लडाखच्या स्थानिक भाषेत शान म्हणजे स्नोलेपर्ड. लडाखच्या निसर्गसुंदर परिसरात आमचा जन्म झाला. सुरुवातीच्या काळात, डोळ्यासमोर होणाऱ्या निसर्गऱ्हास न बघवल्याने वन्यजीव व निसर्गसंवर्धनाची जवाबदारी आम्ही स्वीकारली आणि त्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून दिले. स्नोलेपर्डसारख्या अनेक स्थानिक प्राण्यांची समस्यांपासून सुटका करण्या बरोबरच गावकऱ्यांना यासाठी आवश्यक असे प्रशिक्षणदेण्याचे काम आम्ही केले. खोऱ्यामध्ये उपलब्ध असलेल्या नैसर्गिक गोष्टींपासून शोभेच्या वस्तू तयार करून पर्यटकांसाठी विक्रीची व्यवस्था केली. संवर्धनात येणाऱ्या समस्यांना धीराने तोंड देऊन, दऱ्याखोऱ्यात प्रतिकूल वातावरणात देखील तळमळीने काम करता आले,याचे समाधान वाटते. यासाठी अनेक धोके पत्करून पण उत्साहाने काम करून जैवविविधता, निसर्ग स्नेही पर्यटन आणि नागरिकांचे जीवनमान यांचे रक्षण करताना निसर्गाकडूनच आम्हाला प्रोत्साहन मिळाले.