विशेष प्रतिनिधी / देवरूख :
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचे अखेर निसर्ग चक्रीवादळात रूपांतर झाले. कोकण किनारपट्टीवर घोंगावणाऱया या वादळाचा परिणाम संगमेश्वर तालुक्यातही जाणवला. तालुक्यातील अनेक गावात वृक्ष उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. तर झाडे पडल्याने अनेक गावातील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील नुकसानीचा आकडा सायंकाळपर्यंत समजू शकला नव्हता. तरीही प्रशासनाने सतर्कता बाळगल्याने मोठे नुकसान टळले आहे. वादळाचा परिणाम बुधवार सायंकाळपर्यंत तालुक्यात दिसत होता.
कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वाहत असलेल्या सोसाटय़ाच्या वाऱयामुळे संगमेश्वरजवळच्या डिंगणी कोंडवीवाडीतील ग्रामस्थ राजाराम खांबे यांच्या घरावर झाड पडून घराचे मोठे नुकसान झाले आहे. तर देवरुखजवळच्या हरपुडे मराठवाडी येथील श्री केदारेश्वर मंदिरालगत असलेल्या गायकवाड यांच्या घरासमोरील फणसाचे झाड विजेच्या खांबावर कोसळल्याने विजेच्या तारा तुटल्या आहेत. सुदैवाने वीज पुरवठा खंडित असल्याने दुर्घटना घडली नाही. निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीपासून 50 किमी दूर असलेल्या देवरुखातही जाणवत आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून परिसरात रिमझिम पाऊस सुरु होता. सकाळी 6 पासून पावसाने जोर धरला होता तर पहाटेपासूनच पावसासोबत वाराही वेगाने वाहू लागल्याने तालुक्यातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
देवरूख शहरातील भंडारवाडी येथे वाऱयाने एक वृक्ष मुळासकट उन्मळून पडला. यामुळे घरांचे व शौचालयाचे नुकसान झाले आहे. हे झाड तातडीने बाजूला करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. काही तासातच हे झाड बाजूला करण्यात आले आणि नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. देवरूख-संगमेश्वर मार्गावर साडवली येथे दुपारी 12 वाजता झाड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होता,r मात्र बांधकाम विभागाने काही तासात हे झाड बाजूला केले. यानंतर वाहतूक सुरळीत झाली. देवरूख शहरात नगर पंचायतीतफ्xढ बुधवारी आपत्कालीन पथक तैनात करण्यात आले होते. या पथकाने हरपुडे, तळवडे, मच्छीमार्केट, भंडारवाडी येथे पडलेली झाडे तातडीने बाजूला केली. चक्रीवादळात खबरदारी म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन देवरुख नगर पंचायतीने मंगळवारीच केले होते. याला देवरूख शहरातील व्यापारीवर्गाने चांगली साथ दिली. देवरूख शहरातील बाजारपेठ बुधवारी 100 टक्के बंद होती तर दिवसभर रस्त्यावरही शुकशुकाट होता. संगमेश्वर बाजारपेठेतही अशीच स्थिती पहायला मिळाली.
संगमेश्वर तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा गुरूवारी सकाळी समजणार असून त्यानंतरच तालुक्यातील खरी स्थिती लक्षात येणार आहे. देवरूखचे तहसीलदार सुहास थोरात, पोलीस निरीक्षक निशा जाधव, संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्यासह आपत्कालीन पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.