प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना काळात जर निवडणुका घेता येतात, तर ‘नीट’ म्हणजेच नॅशनल एलिजिबीलिटी ऍण्ड एंट्रन्स टेस्ट’ का घेता येत नाही, असा प्रश्न करत शहरातील डॉक्टरांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून काळे कपडे परिधान करून काम केले. 18 एप्रिल रोजी ‘नीट’ परीक्षा होणार होती. परंतु कोरोनाचे कारण सांगून सरकारने परीक्षा पुढे ढकलली आहे.
यापूर्वी ही परीक्षा जानेवारीमध्ये होणार होती. ती एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. परंतु आता पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचे सांगून पुढील तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे सांगितले. मात्र, कर्नाटक असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर्स (कार्ड-निवासी डॉक्टर संघ) ने सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.
संघाने म्हटले आहे, सरकार कुंभमेळा घेऊ शकते, निवडणुका घेऊ शकते, त्या निमित्ताने रॅली काढून शकते, पण परीक्षा का घेऊ शकत नाही? डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतल्याचे सरकार सांगत असेल तर आम्ही तेच डॉक्टर आहोत, ज्यांनी गतवषी कोविड वॉर्डमध्ये आठ ते दहा तास काम केले आहे. पीपीई किट घालून रुग्णसेवा केली आहे. दोन-तीन तास विद्यार्थी मास्क घालून परीक्षा देऊ शकत नाहीत का? असा प्रश्न कार्डचे अध्यक्ष डॉ. दयानंद सागर यांनी केला आहे.
नीट परीक्षेची तयारी करणाऱया निवासी डॉक्टरांवर असणाऱया मानसिक ताणाची सरकारला कल्पनाच नाही. त्यांना परीक्षा बसू देणे आवश्यक आहे. परीक्षा पुढे ढकलू नयेत, अशी आमची मागणी आहे. ज्यांना ‘नीट’ पीजीसीट मिळू शकते, ते लवकरच कोरोना काळात आरोग्य सेवा बजाविण्यास पुढे येतील, त्यामुळे सरकारचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे.
सरकारने चुकीचा निर्णय घेतला आहे. कोणीही नियमांचे पालन करत नाही. दीड वर्षांपासून विद्यार्थी तयारी करत आहेत. अशा वेळी हॉस्पिटलच्या वॉर्ड्समध्ये आयसोलेट होण्यापेक्षा सर्व खबरदारी घेऊन परीक्षा केंद्रात बसून परीक्षा लिहिणे अधिक सुरक्षिततेचे नाही का? असाही प्रश्न डॉक्टरांनी केला आहे.
लोकप्रतिनिधींपेक्षा डॉक्टरांची अधिक गरज
सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून डॉक्टरांनी काळे कपडे घालून काम केले. शहरातील डॉक्टरांनीसुद्धा निवडणुका होऊ शकतात, तर परीक्षा का होत नाहीत? असा प्रश्न करून काळे कपडे घालून निषेध नोंदविला आहे. कोरोनाची दुसरी लाट तीव्र होत असताना आम्हाला लोकप्रतिनिधींपेक्षा डॉक्टरांची अधिक गरज आहे, असे लेकक्हय़ू हॉस्पिटलचे डॉ. शशिकांत कुलगोड यांनी सांगितले.