नवी दिल्ली / वृत्तसंस्था
वर्ष 2021-2022 करिता नीट-पीजी कौन्सिलिंगचा प्रारंभ 12 जानेवारीपासून होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही घोषणा रविवारी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आणि केंद्र सरकारने निवासी डॉक्टरांना दिलेल्या आश्वासनानुसार हा दिनांक निर्धारित करण्यात आला आहे. या कौन्सिलिंगनंतर डॉक्टरांची संख्या वाढणार असून कोरोका विरुद्धच्या युद्धात देशाला नवे बळ मिळणार आहे, असे प्रतिपादन मांडविया यांनी ट्विटरवरुन केले.
केंद्र सरकारच्या या घोषणेमुळे निवासी डॉक्टरांच्या संघटनेला दिलासा मिळणार आहे. कौन्सिलिंगला होणाऱया विलंबाच्या विरोधात या संघटनेने एक आठवडय़ाचा संप केला होता. त्यामुळे आरोग्यसेवेवर विपरीत परिणाम झाला होता.
गेल्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने या कौन्सिलिंगचा मार्ग मोकळा केला होता. तसेच केंद्र सरकारने त्वरित कौन्सिलिंगला प्रारंभ करावा असा आदेशही दिला होता. जानेवारी आणि एप्रिल अशी दोनवेळा ही प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली होती. देशात वैद्यकीय पदव्युत्तर (पीजी) शिक्षणाच्या 45 हजारांहून अधिक जागा असून आता त्या लवकरच भरल्या जाणार आहेत.