आनंद चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित आनंद चषक 12 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सीसीआय संघाने एसकेई संघाचा 42 धावांनी तर नीना स्पोर्ट्स संघाने आनंद अकादमीचा 7 गडय़ांनी पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले.
भुत्तरामहट्टी येथील मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात आनंद क्रिकेट अकादमी संघाने 25 षटकात 6 बाद 124 धावा केल्या. त्यात श्लोक चचडीने 12, अर्थव करडीने 11, समर्थ रायकरने 10 धावा केल्या. नीनातर्फे झियानने 18 धावांत 4, अमिरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना नीना स्पोर्ट्स संघाने 21.5 षटकात 3 बाद 126 धावा करुन सामना 7 गडय़ांनी जिंकला. त्यात फराजने 7 चौकारासह 47, समर्थने 27, सफीने 11 धावा केल्या. आनंद अकादमीतर्फे समर्थने 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात सीसीआय संघाने 20 षटकात 5 बाद 139 धावा केल्या. त्यात जतीन दुर्गाईने 4 चौकारासह 28, स्वयम खोतने 15 धावा केल्या. एसकेईतर्फे निवृती पावसकरने 30 धावात 3, सिद्धार्थ हेडाने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसकेई संघाने 20 षटकात 4 बाद 97 धावाच केल्या. त्यात विनायक चव्हाणने 23, वेदांत पाटीलने 16 धावा केल्या. नीनातर्फे स्वयम खोतने 17 धावांत 2 गडी बाद केले.
बुधवारचे सामने : विजया अकादमी वि. आनंद अकादमी सकाळी 9.15, बीएससी वि. एसकेई दुपारी 1.30 वाजता.