लंडन / वृत्तसंस्था
ऑलिम्पिक सुवर्ण विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला प्रतिष्ठेच्या ‘लॉरियस वर्ल्ड ब्रेकथ्रू अवॉर्ड’साठी नामांकन लाभले. या पुरस्कारासाठी नामांकन लाभणारा तो पहिला भारतीय क्रीडापटू आहे. सदर सर्वोत्तम ब्रेकथ्रू पुरस्कारासाठी नीरज चोप्राची टेनिस स्टार डॅनिल मेदवेदेव्ह, इम्मा रॅडुकानू, फुटबॉलपटू पेड्री, ऍथलिट रोजस, जलतरणपटू टिटमस यांच्याशी स्पर्धा असेल.
23 वर्षीय नीरज चोप्रा गतवर्षी वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा केवळ दुसरा भारतीय व ‘ट्रक अँड फिल्ड’मधील पहिलाच भारतीय ठरला. टोकियोत संपन्न झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्याने आपल्या दुसऱया प्रयत्नात 87.58 मीटर्सचा थ्रो करत सुवर्णपदकाची कमाई केली. या परफॉर्मन्समुळे तो भारतात एकाच दिवसात सुपरस्टार स्टेटसचा मानकरी ठरला. शिवाय, यामुळे त्याला जागतिक क्रीडा विश्वातही नवी ओळख प्राप्त झाली.
‘टोकियोत ऑलिम्पिक सुवर्ण जिंकल्यानंतर लॉरियस पुरस्कारासाठी नामांकन लाभणे हा देखील माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. एका छोटय़ाशा खेडय़ातून लहानाचा मोठा झालेला एक मुलगा तंदुरुस्तीसाठी एखाद्या खेळाकडे वळतो आणि त्यात अगदी ऑलिम्पिक पोडियमपर्यंत पोहोचतो, हा प्रवास निश्चितच स्पृहणीय आहे’, असे नीरज चोप्राने लॉरियस अकादमीच्या वतीने प्रसारित पत्रकातून नमूद केले.
‘जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणे आणि भारतासाठी सुवर्ण जिंकून देणे हा कारकिर्दीतील ऐतिहासिक टप्पा होता. आता लॉरियस पुरस्कारासाठी नामांकन लाभल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज ऍथलिटमध्ये गणले जाणे माझ्यासाठी अर्थातच खास आहे’, याचा लॉरियसने येथे उल्लेख केला. लॉरियस पुरस्कारांच्या इतिहासात क्रिकेट लिजेंड सचिन तेंडुलकर व दिग्गज महिला कुस्तीपटू विनेश फोगट यांनाही यापूर्वी अन्य कॅटेगरीमधून लॉरियसचे नामांकन लाभले आहे.
विनेश फोगटला 2019 मधील लॉरियस वर्ल्ड स्पोर्टिंग कमबॅक पुरस्कारासाठी नामांकन लाभले तर सचिन तेंडुलकरने 2020 मध्ये ‘लॉरियस बेस्ट स्पोर्टिंग मोमेंट इन द लास्ट 20 इयर्स’ पुरस्कार जिंकला होता. भारताने 2011 वर्ल्डकप जिंकला, त्यावेळी संघसहकाऱयांनी सचिनला आपल्या खांद्यावर उचलून घेतले, तो क्षण पुरस्कार जिंकून देण्यासाठी मोलाचा ठरला होता.
एप्रिलमध्ये पुरस्कार जेत्यांची घोषणा
यंदाही लॉरियस क्रीडा पुरस्कारासाठी 1300 क्रीडा पत्रकार व जागतिक स्तरावरील ब्रॉडकास्टर्सनी 7 कॅटेगरीमधून नामांकने निश्चित केली आहेत. प्रत्येक गटनिहाय लॉरियस क्रीडा पुरस्कार विजेत्यांची घोषणा एप्रिलमध्ये केली जाणार आहे. त्यापूर्वी लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून पुरस्कार जेते निश्चित केले जातील. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अकादमीमध्ये विविध खेळातील 71 महान स्पोर्टिंग लिजेंड समाविष्ट आहेत.
2016 वर्ल्ड यू-20 चॅम्पियनशिपमध्ये चोप्राने यापूर्वी सुवर्ण जिंकले आहे. यंदा ब्रेकथ्रू अवॉर्डसाठी चोप्रासह एफसी बार्सिलोनाचा फुटबॉलपटू पेड्री, तिहेरी उडीत 26 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडणारी युलिमर रोजस व टोकियोत कॅटी लेडेकीला 200 व 400 मीटर्समध्ये दुहेरी मात देणारी जलतरणपटू ऍरिएन टिटमस यांच्यात प्रामुख्याने चुरस असणार आहे.
लॉरियस सर्वोत्तम पुरस्कारासाठी सर्वाधिक चुरस
वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटू पुरस्कारासाठी यंदा सर्वाधिक चुरस रंगण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. एनएफएल स्टार टॉम ब्रॅडी, बायर्न म्युनिचचा प्रॉलिफिक गोल-स्कोअरर रॉबर्ट लेवान्डोवस्की, फॉर्म्युला वनमधील नवा वर्ल्ड चॅम्पियन मॅक्स व्हर्स्टापेन, टेनिसमधील अव्वलमानांकित नोव्हॅक जोकोविच, तसेच दोन महान ऑलिम्पियन जलतरणपटू सेलेब ड्रेसेल व किपचोगे यांच्यात रस्सीखेच रंगणे अपेक्षित आहे. यापैकी ड्रेसेलने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 5 सुवर्ण तर किपचोगेने लागोपाठ मॅरेथॉन सुवर्णपदके जिंकली आहेत.
महिला गटातही बरीच चुरस
ऑलिम्पिकमधील काही अव्वल दर्जाचे पराक्रम साकारणाऱया महिला क्रीडापटूंमध्ये लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स वूमन ऑफ द ईयर पुरस्कारासाठी रस्सीखेच असेल. 100, 200 मीटर्स, 4 बाय 100 मीटर्स रिलेमध्ये सुवर्ण जिंकणारी इलेन थॉम्प्सन-हेराह, ट्रक अँड फिल्डमधील सर्वाधिक यशस्वी अमेरिकन ऑलिम्पियन ऍलिसन फेलिक्स, एकाच ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक 4 सुवर्ण व 3 कांस्य जिंकणारी ऑस्ट्रेलियन जलतरणपटू इम्मा मॅकॉन, 2 सुवर्ण व 2 रौप्य जिंकणारी अमेरिकन जलतरणपटू कॅटी लेडेकी यांच्यात यासाठी रस्सीखेच असेल.
इटालियन पुरुष फुटबॉल संघही पंट-रनर
लॉरियस वर्षातील सर्वोत्तम संघ पुरस्कारासाठी इटलीचा पुरुष फुटबॉल संघ आघाडीवर असल्याचे चित्र आहे. या संघाने 2020 मध्ये युरो स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. कोपा अमेरिका स्पर्धा जिंकणारा मेस्सीचा अर्जेन्टिना पुरुष फुटबॉल संघ आणि पहिलीवहिली चॅम्पियन्स लीग जिंकणारा एफसी बार्सिलोना महिला संघ देखील या पुरस्कारासाठी शर्यतीत आहेत. 8 पैकी 7 इव्हेंट्समध्ये सुवर्ण जिंकणाऱया चीनच्या ऑलिम्पिक डायव्हिंग संघाला देखील पुरस्कार जिंकण्याची अपेक्षा आहे.
विविध लॉरियस पुरस्कारासाठी गटनिहाय नामांकने
वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रीडापटू ः सेलेब ड्रेसेल-अमेरिका (जलतरण), इलियूड केपचोगे-केनिया (ऍथलेटिक्स), मॅक्स व्हर्स्टापेन-नेदरलँड्स (मोटर रेसिंग), नोव्हॅक जोकोविच-सर्बिया (टेनिस), रॉबर्ट लेवान्डोवस्की-पोलंड (फुटबॉल), टॉम ब्रॅडी-अमेरिका (अमेरिकन फुटबॉल).
वर्षातील सर्वोत्तम महिला क्रीडापटू ः ऍश्ले बार्टी-ऑस्ट्रेलिया (टेनिस), ऍलिसन फेलिक्स-अमेरिका (ऍथलेटिक्स), कॅटी लेडेकी-अमेरिका (जलतरण), इम्मा मॅकॉन-ऑस्ट्रेलिया (जलतरण), ऍलेक्सिया पुटेलास-स्पेन (फुटबॉल), इलेन थॉम्पसन-जमैका (ऍथलेटिक्स).
वर्षातील सर्वोत्तम संघ ः अर्जेन्टिना पुरुष फुटबॉल संघ (कोपा अमेरिका विजेते), बार्सिलोना महिला फुटबॉल संघ-स्पेन (पहिले चॅम्पियन्स लीग जेते), इटली पुरुष फुटबॉल संघ (युरोपियन चॅम्पियनशिप), मर्सिडीज एएमजी पेट्रोनास फॉर्म्युला वन टीम, जर्मनी (कन्स्ट्रक्टर्स चॅम्पियनशिप), बक्स बास्केटबॉल संघ-अमेरिका (दुसऱयांदा एनबीए चॅम्पियन्स).
वर्षातील सर्वोत्तम ब्रेकथू पुरस्कार ः नीरज चोप्रा-भारत (ऍथलेटिक्स), डॅनिल मेदवेदेव्ह-रशिया (टेनिस), पेड्री-स्पेन (फुटबॉल), इम्मा रॅडुकानू-युके (टेनिस), युलिमर रोजस-व्हेनेझुएला (ऍथलेटिक्स), ऍरिएन टिटमस-ऑस्ट्रेलिया (जलतरण).
वर्षातील सर्वोत्तम कमबॅक पुरस्कार ः सिमोन बाईल्स-अमेरिका (जिम्नॅस्टिक्स), स्काय ब्राऊन-युके (स्केटबोर्डिंग), मार्क कॅव्हेन्डिश-युके (सायकलिंग), टॉम डॅले-युके (डायव्हिंग), मार्क मार्क्वेझ-स्पेन (मोटरसायकलिंग), ऍनेमिएक व्हान व्ल्यूटेन-नेदरलँड्स (सायकलिंग).
दिव्यांग गटातील वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटू ः दिएदे डे ग्रूट-नेदरलँड्स (व्हीलचेअर टेनिस), मार्सेल हय़ूज-स्वित्झर्लंड (व्हीलचेअर ऍथलेटिक्स), शिंगो कुनिएदा-जपान (व्हीलचेअर टेनिस), जेत्झे प्लॅट-नेदरलँड्स (पॅरा सायकलिंग-पॅरा ट्रायथ्लॉन), सुसाना रॉड्रिग्यूज-स्पेन (पॅरा ट्रायथ्लॉन), साराह स्टोरी-युके (पॅरा सायकलिंग).