कोरोनामुळे तुर्कीचा ‘सीमा बंद’चा निर्णय, शिवपाल सिंगही परतणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा सध्या तुर्कीमध्ये ट्रेनिंग घेत आहे. मात्र कोरोना व्हायरसचा संपूर्ण जगात फैलाव झाला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तो लवकरच मायदेशी परतणार आहे. या व्हायरसच्या धास्तीने अनेक देशांनी विदेशी प्रवाशांना आपापल्या देशात प्रवेशबंदी केलेली आहे.
22 वर्षीय नीरज मागील एक महिन्यापासून तुर्कीमध्ये सराव करीत आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेत त्याने 87.86 मी. भालाफेक करीत ऑलिम्पिक पात्रता मिळविलेली आहे. गेल्या वर्षी त्याच्या हाताच्या कोपरावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यातून पुनरागमन केल्यानंतर त्याने ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले होते. ‘18 मार्चपासून तुर्कीने आपल्या देशाची सीमा विदेशी प्रवाशांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्याआधीच नीरजला तुर्की सोडावे लागणार आहे. बुधवारी तो भारतात दाखल होणार आहे,’ असे भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनच्या एका पदाधिकाऱयाने सांगितले. ‘त्याचप्रमाणे 17 एप्रिल रोजी दोहामध्ये होणाऱया डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धेतही तो सहभागी होणार नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. डायमंग लीग स्पर्धा आयोजकांनीही डायमंड लीगचे पहिले तीन टप्पे लांबणीवर टाकणार असल्याचे मंगळवारी जाहीर केले. दोहामधील स्पर्धेने या लीगची सुरुवात होणार होती.
भारताचा आणखी एक भालाफेकपटू शिवपाल सिंगनेही ऑलिम्पिक पात्रता मिळविली असून तोही दक्षिण आफ्रिकेहून मायदेशी परतणार आहे. पोश्चेफस्ट्रूम येथे तो ट्रेनिंग घेत आहे. ‘शिवपाल सिंगही दक्षिण आफ्रिकेहून परतणार आहे. विदेशात ट्रेनिंगसाठी आता एकही भारतीय क्रीडापटू ठेवला जाणार नाही. सध्याची परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे की, कोणताही देश केव्हाही आपली सीमा बंद करू शकतो किंवा विमाने रद्द करू शकतो. कोणत्याही क्रीडापटूला एकटे सोडून देण्याचा धोका आम्ही कदापिही पत्करणार नाही. त्यांना ताबडतोब मायदेशी आणण्याचा आमचा प्रयत्न असेल,’ असे एएफआयच्या एका अधिकाऱयाने सांगितले.
24 वर्षीय शिवपालने 85 मीटर्सची पात्रता मर्यादा याच महिन्यात पोश्चेफस्ट्रूम येथे झालेल्या एसीएनडब्ल्यू ऍथलेटिक्स स्पर्धेत पार करताना 85.87 मी. भालाफेक केली होती. नीरजनंतर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला शिवपाल हा दुसरा भालाफेकपटू आहे.