पोचेफस्ट्रूम (द. आफ्रिका) / वृत्तसंस्था
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने येथील एसीएनई लीगमध्ये 87.86 मीटर्सची फेक करत टोकियो ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्ध केली. ढोपराच्या दुखापतीतून सावरत त्याने केलेले हे यशस्वी पुनरागमन विशेष लक्षवेधी ठरले.
22 वर्षीय नीरज चोप्राला यापूर्वी 2019 च्या पूर्ण हंगामात दुखापतीमुळे बाहेर रहावे लागले होते. मात्र, येथे चौथ्या प्रयत्नात ऑलिम्पिक पात्रतेसाठी आवश्यक 85 मीटर्सची फेक करत त्याने आपला सहभाग निश्चित केला. त्याने प्रारंभी 81.76 मीटर्सची फेक केली व नंतर आपल्या कामगिरीत त्यानंतर सातत्याने सुधारणा केली. दुसऱया प्रयत्नात 82 मीटर्स, तिसऱया प्रयत्नात 82.57 मीटर्सची फेक केल्यानंतर त्याने चौथ्या प्रयत्नात 87.86 मीटर्सची सर्वोच्च फेक केली. ही त्याची कारकिर्दीतील दुसरी सर्वोत्तम फेकही ठरली. 2018 जकार्ता आशियाई स्पर्धेत त्याने 88.06 मीटर्स फेकीसह सुवर्ण जिंकले व ही त्याची आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे.
नीरजला यापूर्वी आयएएएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप, डायमंड लीग व आशियाई चॅम्पियनशिपमध्ये दुखापतीमुळे सहभागी होता आले नव्हते. 2018 जकार्ता आयिशाई स्पर्धेत त्याने शेवटचे प्रतिनिधीत्व नोंदवले. ही त्याच्यासाठी शेवटची प्रतिष्ठेची स्पर्धा ठरली. नंतर मे 2019 मध्ये त्याला दुखापतीवर शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली. गतवर्षी राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्याचा त्याचा मानस होता. पण, भारतीय फेडरेशनने त्याला परवानगी दिली नव्हती.
ऍथलेटिक्समधून टोकियो ऑलिम्पिकसाठी सर्वप्रथम पात्रता निश्चित करण्याचा मान राष्ट्रीय विक्रमधारक केटी इरफानकडे जातो. त्याने गतवर्षी मार्चमध्ये 20 किलोमीटर्स इव्हेंटच्या माध्यमातून पात्रता संपादन केली. नंतर दोहा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अविनाश साबळेने (पुरुष 3 हजार मीटर्स स्टीपलचेस) व मिश्र 4ƒ400 रिले गटात भारतीय पुरुष संघाने टोकियो ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.