19 कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
फरार हिरा व्यापारी नीरव मोदी याचा बंधू नेहल मोदी याच्यावर आता अमेरिकेत अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. बहुस्तरीय योजनेच्या माध्यमातून नेहल मोदी याने जगातील सर्वात मोठय़ा डायमंड कंपनीपैकी न्यूयॉर्कस्थित एका कंपनीशी जवळीक साधून 2.6 दशलक्ष डॉलर्सची (19 कोटींपेक्षा जास्त) फसवणूक केल्याचा आरोप आहे.
मॅनहॅटनमधील एका बडय़ा कंपनीकडून 2.6 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे हिरे घेतल्याप्रकरणी न्यूयॉर्कमधील न्यायालयात मोठय़ा फसवणुकीचा आरोप नेहल मोदी याच्यावर करण्यात आला आहे. आता नेहल मोदी याला न्यायालयीन लढावी लागणार आहे. न्यूयॉर्कच्या कायद्यांतर्गत, एक दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक रकमेशी संबंधित अपहार झाल्यास ‘मोठी गुन्हेगारी फसवणूक’ असे संबोधण्यात येते. 2015 मध्ये ही फसवणूक झाल्याचा दावा खटल्यात करण्यात आला आहे. नेहल मोदी याने एका कंपनीसमवेत बनावट सादरीकरण करण्यासाठी ‘एलएलडी डायमंड्स’कडून 2.6 दशलक्ष डॉलर्सचे हिरे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.