कडेकोट बंदोबस्तात गांधीनगरला हलवले ः 15 ऑक्टोबरपर्यंत तिथेच राहणार
गांधीनगर / वृत्तसंस्था
भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्माला मारण्याच्या उद्देशाने भारतात घुसलेला पाकिस्तानी कैदी रिझवान अश्रफ याची नार्को चाचणी केली जाणार आहे. राज्यातील एकमेव उच्च सुरक्षा तुरुंगात बंदिस्त असलेल्या रिझवान अश्रफची न्यायालयाच्या आदेशानुसार नार्को चाचणी होत आहे. रिझवानला रविवारी गुजरातमधील गांधीनगर येथे कडेकोट पोलीस संरक्षणात नार्को चाचणीसाठी नेण्यात आले. 15 ऑक्टोबरपर्यंत कैद रिझवान तिथेच राहणार आहे.
श्रीगंगानगरच्या न्यायालयाने नुकताच कारागृह अधीक्षक पारस जांगीड यांच्या नावाने नार्को चाचणीसंदर्भात आदेश जारी केला आहे. हा आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याला गुजरातमधील गांधीनगर येथे पाठवण्यात आले. रिझवान याला 16 जुलै रोजी श्रीगंगानगर सेक्टरमधील भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या खारवा चौकीवर पकडण्यात आले होते. नुपूर शर्माला ठार मारण्याच्या इराद्याने त्याने सीमा ओलांडून भारतात घुसखोरी केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला मध्यवर्ती कारागृह श्री गंगानगर येथून उच्च सुरक्षा कारागृहात हलवण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालयाने गेल्या महिन्यात कैद्याला समुपदेशकाची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. चौकशीत आरोपीने आपले नाव रिजवान अश्रफ असल्याचे उघड केले. तो उत्तर पाकिस्तानातील मंडी बहाउद्दीन शहरातील रहिवासी आहे. नुपूर शर्माला मारण्याच्या इराद्याने आपण सीमा ओलांडल्याचे त्याने कबूल केले आहे.
नार्को टेस्ट म्हणजे काय समजले?
एखादी व्यक्ती माहिती देत नसल्यास नार्को चाचणीचा वापर करून अधिक सविस्तर माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच एखाद्या व्यक्तीच्या मनातून सत्य बाहेर काढण्यासाठी केलेला हा प्रयोग असतो. नार्को चाचणी बहुतेक गुन्हेगारी प्रकरणांमध्येच वापरली जाते. अगदी क्वचितच घटनांमध्ये ही चाचणी केली जाते. नार्को विश्लेषण ही फॉरेन्सिक तपासणी असून ती तपास अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, डॉक्टर आणि फॉरेन्सिक तज्ञ यांच्या उपस्थितीत केली जाते.