स्कुटरचालक जागीच ठार
प्रतिनिधी /मडगाव
काल रविवारी सायंकाळी 6.40 वा. नुवे बगल रस्त्यावरील जंक्शनजवळ ऍक्टिव्हा स्कूटर (जीए 08 एच 7301) आणि हुंडाय वेर्ना कार (जीए 08 एम 8528) यांच्यात झालेल्या भीषण अपघात स्कूटर चालक सोपोरो परेरा (45) हा जागीच ठार झाला. तो नावेली येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे, नुवे बगल रस्त्यावरील जंक्शनवरून स्कूटर चालक सोपोरो परेरा हा अचानक रस्त्याच्या मध्यभागी आला. त्यावेळी भरधाव वेगातील हुंडाय वेर्णा कारची जोरदार धडक त्याला बसली व तो जागीच ठार झाला. हा अपघात येवढा भिषण होता की, स्कूटर चालक कारची धडक बसल्यानतंर बराच दूरवर फेकला गेला होता. या अपघात प्रकरणी पोलिसांनी कार चालकाविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.
नुवे बगल रस्त्यावर किमान तीन-चार जंक्शन असून ही जंक्शन आत्ता अपघाताला कारणीभूत ठरू लागली आहे. बगल रस्त्यावरून वाहने भरधाव वेगात येत असतात. यावेळी जंक्शनवरून एखादे वाहन अचानक मुख्य रस्त्यावर आले तर तर भरधाव वेगातील वाहनाची धडक बसून अपघात घडतात व कालचा अपघात सुद्धा अशाच प्रकारे घडला आहे.