उद्योगमंत्री जगदीश शेट्टर : बेंगळुरात जागतिक एमएसएमई दिन
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्य सरकारने लागू केलेल्या नूतन औद्योगिक धोरणात लघु व सूक्ष्म उद्योगांना प्राधान्य देण्यात आले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिली. औद्योगिक सुविधा कायदा आणि ऍफिडविट बेस्ड क्लियरेन्स यासारख्या उपाययोजना देशात लागू केल्या गेल्या आहेत. त्यामुळे राज्यात औद्योगिक आस्थापनातील अडथळे दूर करण्यात यश आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक एमएसएमई (मायक्रो, स्मॉल आणि मेडियम एंटरप्रायझेस) दिनानिमित्त बेंगळूर ब्रँच ऑफ एसआयआरसी, द इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, एमएसएमई आणि स्टार्ट अप ऑफ आयसीआय समिती आणि पिण्य औद्योगिक संघाच्या सहयोगाने आयोजित वेबिनार कार्यक्रमात सहभागी होऊन ते बोलत होते.
मंत्री शेट्टर पुढे म्हणाले, सार्थक योजनेद्वारे अनेक सुविधा दिल्या जात असून ऑडिटर्स असोसिएशनच्या लेखा परीक्षकांनी याबाबत उद्योजकांमध्ये जनजागृती करावी.लघु आणि मध्यम उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. तसेच उद्योग यशस्वी करण्यात लेखा परीक्षकांची महत्त्वाची भूमिका असते. केंद्र आणि राज्य सरकारांनी उद्योगांच्या फायद्यासाठी आणि विकासासाठी अनेक प्रकल्प सुरू केले आहेत, असे त्यांनी सांगितले.
सार्थक ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे आम्ही छोटय़ा व्यवसाय आणि विविध भागीदारांमध्ये दुवा तयार केला आहे. यामुळे छोटय़ा व्यवसायांना कच्चा माल खरेदी करण्यास, वितरकांशी संवाद साधण्यास आणि कुशल कामगारांना दहा वेगवेगळय़ा सुविधा उपलब्ध करून देण्यात सक्षम होईल, असेही ते म्हणाले.
या वेबिनारला बेंगळूर ब्रँच ऑडिटर असोसिएशनचे अध्यक्ष बी. टी. शेट्टी, पिण्य औद्योगिक संघाचे अध्यक्ष सी. प्रकाश, आयसीएआयचे सचिव पन्नराज, रविंद्र कोरे आदी उपस्थित होते.