प्रतिनिधी /बेळगाव
नूतन जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी सोमवारी सूत्रे स्वीकारली. लक्ष्मण निंबरगी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी नव्या पोलीसप्रमुखांना मुख्यालयात सलामी देण्यात आली.
गेली तीन वर्षे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी अनेक विधायक उपक्रम राबविले आहेत. ते सर्व उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहेत, असे नूतन पोलीसप्रमुखांनी सांगितले. पोलीस दल अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत, असे ते म्हणाले.
27 जून रोजी सरकारने राज्यातील 16 आयपीएस अधिकाऱयांच्या बदल्या केल्या होत्या. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांची बदली बेंगळूर पश्चिम विभागाच्या पोलीस उपायुक्तपदी झाली आहे. सध्या त्या पदावर कार्यरत असलेले डॉ. संजीव पाटील यांची वर्णी बेळगावला लागली. सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारला.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी केएलई संस्थेच्या डॉ. बी. एस. जिरगे सभागृहात बेंगळूरला बदली झालेले लक्ष्मण निंबरगी यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. तर सोमवारी पदभार स्वीकारलेल्या नूतन पोलीसप्रमुखांचे स्वागत करण्यात आले. लक्ष्मण निंबरगी यांनी तब्बल तीन वर्षे उत्तमरित्या सेवा बजावली आहे. पूर, कोरोना, विधान परिषद निवडणुकीच्यावेळी अधिकारी व पोलिसांना विश्वासात घेऊन त्यांनी लोकाभिमुख प्रशासन दिले आहे.