नृत्य हा सिनेमातील एक अती महत्वाचा घटक मानला जातो. किंबहुना नृत्याशिवाय चित्रपट ही कल्पना घेऊन आलेले आणि यशस्वी ठरलेले चित्रपट अगदीच मोजके असतील. त्याही पुढे जाऊन फक्त नृत्य हाच विषय केंद्रस्थानी ठेवून बनलेले अनेक चित्रपट यशस्वी ठरू शकतात. याची प्रचिती देखील बॉलिवूडच्या विश्वाने अनेकदा घेतली आहे. या शुक्रवारी प्रदर्शित झालेला ‘स्ट्रीट डान्सर’ हा चित्रपट अशा यशोगाथेमध्ये जाऊन बसणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
टी. व्ही.वर येणारे रिऍलिटी शो हा रसिकांच्या जिव्हाळय़ाचा विषय तर या
रिऍलिटी शोमध्ये यश मिळवू पाहण्यासाठी केली जाणारी धडपड हा आता बॉलिवूडच्या हक्काचा विषय बनला आहे. त्यामुळेच नृत्य आणि गाण्याचा रिऍलिटी शोमधील स्पर्धक असा नायक (किंवा नायिका) केंद्रस्थानी ठेवून बनणाऱया चित्रपटांची चांगलीच चलती आहे. त्यामधून काही नव्या तारकांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. याच मार्गावर आता नव्या चित्रपटाचे आगमन झाले आहे.
नृत्याच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटविणाऱया प्रभूदेवा या दाक्षिणात्य नृत्य दिग्दर्शकाचे नाव आज हुकमी एक्का आहे. या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट गाजवून त्याने बॉलिवूडदेखील काबीज केले आहे. प्रामुख्याने ‘एबीसीडी’ या नृत्यावर आधारित चित्रपटाने बॉलिवूड स्टाईल डान्सची पेझ प्रस्थापित केली आहे. एनीबडी कॅन डान्स म्हणजेच नृत्य करणं कुणालाही जमू शकतं ही शिकवणच त्याने रूजविली. त्यामुळे या चित्रपटाच्या मूळ कथानकाचे विस्तारीत भागही प्रदर्शित होणे स्वाभाविकच.
बेळगावातील स्वरूप – नर्तकी आणि प्रकाश अशा दोन चित्रपट गृहांमध्ये स्ट्रीट डान्सरचे आगमन झाले आहे. चित्रपटातील कलाकार वरूण धवन आणि श्रद्धा कपूर हे तर आजच्या युवा पिढीच्या गळय़ातील ताईत आहेत. त्यांची लोकप्रियता या चित्रपटाद्वारे अधिक दृढ होण्याची चिन्हे आता दिसत आहेत. सोबतीला इतर लोकप्रिय कलाकारांची फौजही आहे. येणाऱया दिवसांत हा चित्रपट व्यावसायिक गणितांचे समीकरण निश्चितच यशस्वी करेल आणि रसिक प्रेक्षकांसाठी ही नववर्षातील उत्तम भेट ठरेल, असे मानण्यास हरकत नाही.
उपेंद्र बाजीकर