कुरुंदवाड/प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील बेकायदेशीर दारू विक्री आणि दारू अड्डे बंद करावेत या मागणीसाठी महिलांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. अखेर सायंकाळी उशिरा शिरोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एन.एन.सुळ यांनी या महिलांना ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सरबत घेऊन हे उपोषण सोडण्यात आले. मात्र तात्पुरते हे आंदोलन स्थगित झाल्याचे या महिलांनी यावेळी सांगितले.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील महिलांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांना याबाबतचे निवेदन दिले होते. त्यानुसार त्यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशी आपले बेमुदत उपोषण सुरू केले होते. याबाबत त्यांनी ग्राम सभेत ही मागणी केली होती. त्यावेळी उपसरपंच खोचरे यांनी ही बाब गंभीर आहे आणि योग्य ती कारवाई करू उपोषण मागे घ्या असे आवाहन केले.
मात्र या महिला आपल्या आपल्या मागणीवर ठाम होत्या. गावातील अभिजीत जगदाळे, विनोद पुजारी, दत्ता भोसले, सागर धनवडे तसेच काही नागरिक आणि सहाय्यक फौजदार राजेंद्र धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल अमित पवार यांनी पुढाकार घेऊन हे उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली. यावेळी त्यांनी याबाबत आपण अकरा लोकांच्यावर केसेस दाखल केले असल्याचे नमूद केले. यानंतर काही वेळाने शिरोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एन. एन. सूळ हे उपोषणस्थळी आले आणि त्यांनी महिलांशी चर्चा करून येत्या दोन दिवसात ज्या ठिकाणी गावामध्ये अवैद्य दारू विक्री सुरू आहे त्या ठिकाणी धडक कारवाई करून संबंधितावर कडक शासन केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळीही महिला तयार नव्हत्या मात्र निश्चित कारवाई करू असे सांगितल्यावर सूळ यांच्या हस्ते सरबत घेऊन हे उपोषण मागे घेतले.
या उपोषण आंदोलनाला अनेक ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. या उपोषणात विजयश्री सोमन, वंदना शिंदे, सुनीता शिंदे, अंजना दळवी, सुनीता मोरे, दिपाली मिटके, मनीषा लाटवडे आदी महिला सहभागी झाल्या होत्या.