प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन करण्यासाठी 15 ते 17 मार्च दरम्यान बेंगलोरची नॅक पिअर कमिटी शिवाजी विद्यापीठात येणार आहे. त्या दृष्टीने अधिविभागांनी नॅकसाठी तयार केलेला लेखी अहवाल व ऑनलाईन प्रेजेंटेशन पाहून पूरक सूचना करण्याचे काम विद्यापीठ प्रशासनाकडून सुरू आहे. तसेच ज्या अधिविभागांनी उत्कृष्ट अहवाल केले आहेत, त्यांचे कौतुक देखील केले जात आहे. एकूणच नॅक मूल्यांकनाच्या दृष्टीने विद्यापीठाची जय्यत तयारी सुरू आहे.
नॅक कमिटी विद्यापीठात आल्यानंतर कमिटीतील सदस्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय, प्रेजेंटेशन कोणी करायचे, प्रश्नाची उत्तरे कोणी द्यायची, यासह अन्य कामांसाठी समित्या नेमण्यात आल्या आहेत. या समित्यांना कामे वाटून दिली असून प्रत्येकाने आपआपली जबाबदारी कशी पार पाडायची, यासंदर्भात सूचनाही दिल्या जात आहेत. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील प्रत्येक विभागात जाऊन पाहणी करीत आहेत. यंदा इमारतींची रंगरंगोटी करण्यापेक्षा गुणवत्तेला विद्यापीठाने महत्व दिले आहे.