नव्या चेहऱयांना संधी देणार ः 20 वर्षे केले होते पक्षाचे नेतृत्व
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी डेमोक्रेटिक पार्टीच्या सभागृहातील नेतेपदावरून हटण्याची घोषणा केली आहे. हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्समध्ये रिपब्लिकन पार्टीच्या विजयानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. डेमोक्रेटिक पार्टीतील तरुण चेहऱयांना संधी देण्याची माझी इच्छा आहे. कुठल्याही दावेदाराचे मी समर्थन करणार नाही. सर्व दावेदारांचा स्वतःचा प्लॅन अन् व्हिजन असेल असे उद्गार 82 वर्षीय पेलोसी यांनी काढले आहेत.
पेलोसी सलग दोन दशकांपासून वरिष्ठ सभागृहात स्वतःच्या पक्षाच्या सर्वात मोठय़ा नेत्या राहिल्या आहेत. पदावरून हटण्याच्या घोषणेनंतर पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांची जागा घेण्यासाठी स्वतःची दावेदारी सादर केली आहे. 52 वर्षीय हकीम जेफरीज यांचे नाव सध्या याप्रकरणी आघाडीवर आहे. 2021 मध्ये झलोल्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्सच्या सभापती पदाच्या निवडणुकीत हकीम यांनी पेलोसी यांना आव्हान दिले होते, परंतु त्यांना त्यावेळी केवळ एकच मतच मिळू शकले होते. रिपब्लिकन पार्टीने सभापती पदासाठी केविन मॅकार्थी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पेलोसी अन् मॅकार्थी हे परस्परांचे विरोधक मानले जातात.
तैवानचा दौरा करणाऱया नेत्या
नॅन्सी पेलोसी यांनी अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीपूर्वी तैवानचा दौरा करत पूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते. चीनच्या इशाऱयानंतरही करण्यात आलेल्या या दौऱयामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पेलोसी यांनी तैवानचा हा दौरा अमेरिकेतील मतदारांना स्वतःच्या पक्षाच्या बाजूने वळविण्यासाठी केला होता असे मानले जाते.
धाडसी नेत्या अशी ओळख
1991 मध्ये खासदार असताना नॅन्सी एका शिष्टमंडळासोबत चीनच्या दौऱयावर गेल्या होत्या. या दौऱयादरम्यान त्यांनी राजधानी बीजिंगमधील प्रसिद्ध तियानमेन चौकात पोहोचून चीनचा निषेध केला होत. नॅन्सी आणि त्यांच्या सहकाऱयांनी लोकशाहीच्या समर्थनार्थ पोस्टर्स झळकविली होती. तियानमेन चौकात चीनने 1989 मध्ये हजारो लोकशाही समर्थकांना रणगाडय़ांखाली चिरडून ठार केले होते.
ट्रम्प यांच्याशी राजकीय संघर्ष
पेलोसी या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या राजकीय संघर्षामुळे डेमोक्रेट्समध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. जाहीर सभेत ट्रम्प यांच्या भाषणाची प्रत त्यांनी फाडली होती. ट्रम्प यांच्या भाषणाला पेलोसी यांनी ‘अविश्वासाचे घोषणापत्र’ ठरविले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी या सर्व वादांमुळेच पेलोसी यांना ‘क्रेझी नॅन्सी’ अशी उपमा दिली होती.
अमेरिकेतील तिसऱया क्रमांकाच्या नेत्या
नॅन्सी पेलोसी या अध्यक्ष आणि उपाध्यक्षानंतर अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली नेत्या आहेत. नॅन्सी यांचे वडिल आणि बंधू एका शहराचे महापौर राहिले आहेत. 1987 मध्ये नॅन्सी पहिल्यांदा खासदार झाल्या होत्या. 2007 मध्ये अमेरिकेच्या संसदेच्या सभापती होणाऱया पहिल्या महिला ठरल्या होत्या. 82 वर्षीय नॅन्सी यांचा हा चौथा कार्यकाळ होता.
पतीवर जीवघेणा हल्ला
अमेरिकेच्या संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांचे पती पॉल पेलोसी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोर प्रत्यक्षात नॅन्सी यांच्यावर हल्ला करणार होता. हल्लेखोराने पेलोसी यांच्या सॅन फ्रान्सिस्को यांच्या घरात घुसून पॉल यांना मारहाण केली होती.