वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बेंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) अध्यक्षपदी माजी कसोटीवीर व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नियुक्तीची घोषणा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी रविवारी केली.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे यापूर्वीचे अध्यक्ष तसेच माजी कर्णधार राहुल द्रविडची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याने एनसीएचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. क्रिकेटचा विकास साधण्यासाठी माजी अनुभवी क्रिकेटपटूची मदत जरूरीची आहे. त्या अनुषंगाने लक्ष्मण निश्चितपणाने मोलाचे योगदान देऊ शकतो, असे गांगुलीने वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून नवे दर्जेदार क्रिकेटपटू देशाला उपलब्ध करून दिले जातात. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदाची सूत्रे व्हीव्हीएस लक्ष्मणकडे सोपविण्यासाठी अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शाह यांचे एकमत आहे.
भारतीय क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठी गेली काही वर्षे द्रविड आणि लक्ष्मण यांनी एकत्रित प्रयत्न केले आहेत. त्याच्या प्रयत्नामुळे भारताला नव्या पिढीतील दर्जेदार क्रिकेटपटू उपलब्ध होत आहेत, असेही बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले. रवि शास्त्राrच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर संपुष्टात आला. आता राहुल द्रविडकडे प्रमुख प्रशिक्षकपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून भारत अ तसेच भारत युवा संघ तयार करण्यात आला. या दोन्ही संघांचा दर्जा निश्चितच सुधारत असून आगामी दोन वर्षांच्या कालावधीत या दोन्ही संघांच्या कामगिरीत विविध स्पर्धांमध्ये सातत्य दिसेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली. भारतीय संघातील रोहित शर्मा तसेच रविचंद्रन अश्विन यांनी राहुल द्रविडला आपले नेहमीच सहकार्य लाभेल, अशी ग्वाही दिली आहे.