प्रतिनिधी / विटा
संपूर्ण देशावर कोरोना चे संकट आलेले आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. याच भावनेतून नॅशनल गोल्ड अँड सिल्व्हर रिफायनर्स असोसिएशनने मुख्यमंत्री सहायता निधीस चार लाख रुपये निधी दिला. निधीचा धनादेश सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रतापदादा साळुंखे, सचिव शंकर पवार, शिवप्रताप पतसंस्थेचे संचालक विठ्ठलराव साळुंखे उपस्थित होते.
सध्या संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट आलेले आहे. अशावेळी आपण समाजाचे देणे लागतो, या सामाजिक भावनेतून नॅशनल गोल्ड अँड सिल्व्हर रिफायनर्स असोसिएशनने मुख्यमंत्री सहायता निधीस चार लाख रुपयांचा निधी दिला. निधीचा धनादेश सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
यावेळी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतापदादा साळुंखे म्हणाले, नॅशनल गोल्ड अँड सिल्व्हर असोसिएशनने नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे. संकटकाळी संघटना नेहमी उभी असते. देशभर आपापल्या क्षेत्रात गलाई बांधव मास्क आणि सॅनिटायझेर यांचे मोठ्या प्रमाणात वाटप करीत आहेत. आमचे काही बांधव देशातील विविध राज्यात अडकले आहेत. त्यांनी सध्या त्याच ठिकाणी रहावे. आपापल्या राज्यातील शासन आपली काळजी घेण्यास कटीबद्ध आहे. आपल्याला कोणतीही अडचण असेल, तर संपर्क करा, असोसिएशन मार्फत त्याची तात्काळ दखल घेतली जाईल. यापुढेही शासनाला मदत करण्यासाठी संघटना नेहमीच अग्रेसर असेल. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे आणि सामान्य माणसाला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा साळुंखे यांनी व्यक्त केली.