प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील रविवार पेठेतील मार्केटयार्डमध्ये असलेल्या नॅशनल चिकन सेंटरमध्ये कामगारानेच 86 हजारांची रोख रक्कम व 4 हजारांचा मोबाईल चोरुन 90 हजारांवर डल्ला मारल्याची घटना घडली. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात शहबाज मिनियार (वय 22, रा. अखतर अली, नाईबझार, तुलसीपुर, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून तो फरारी झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी 2.15 वाजण्याच्या सुमारास सातारा येथील रविवार पेठ, मार्केटयार्डमधील नॅशनल चिकन सेंटरमधून शहबाज मिनियार या कामगाराने 86 हजार रुपये रोख व 4 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला.
याबाबत दुकानचे मालक अजिम आयुब भालदार (वय 29, रा. देशमुख कॉलनी करंजे पेठ सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. परप्रांतिय कामगार अल्प वेतनात राबवण्यास मिळतात म्हणून त्यांना नोकरी देणाऱयांसाठी ही घटना धक्का देणारी ठरलीय. परप्रांतियांवर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न या घटनेमुळे अधोरेखीत झाला आहे.