पंजाबमधली निवडणूक दिवसेंदिवस चुरशीची होत आहे. मतदानाला आता केवळ एक दिवसाचा अवधी राहिला आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी जीवाची बाजी लावून गेले पंधरा दिवस राज्यभर प्रचार केला आहे. आता निवडून येण्यासाठी अनु÷ाने, देवपूजा, दानधर्म इत्यादी धार्मिक कृत्यांचा आधार घेतला जात आहे.
काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग भाजपशी युती करून निवडणूक लढवित आहेत. ते पतियाळा शहर मतदारसंघातून स्पर्धेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी शनीची शांती करून घेतली आहे. यासाठी त्यांनी म्हशीचे पिलू (रेडकू) दान दिले. तसेच मंदिरामध्ये पूजाअर्चाही केली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नीही धर्माचा आधार घेण्यात मागे नाहीत. त्यांनी हत्तीवर स्वार होऊन काही अंतर प्रवास करण्याचे व्रत पार पाडले आहे. हे व्रत त्यांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी केले होते. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. त्यामुळे त्यांचा या व्रतावर विश्वास दृढ झाल्याची चर्चा आहे.
सिद्धूंचेही मंत्रतंत्र
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांचा एक व्हिडिओ लोकप्रिय झाला होता. त्यात ते मंत्रतंत्र करताना दिसून येतात. या व्हिडिओची खूप चेष्टाही त्यांच्या विरोधकांनी उडविली होती. त्यानंतर सिद्धूंनी आपण मंत्रतंत्र नव्हे तर ध्यानधारणा करीत होतो, असे स्पष्टीकरणही दिले होते. एकंदर नेत्यांना केवळ प्रचारासाठी उठवलेले कष्ट पुरेसे वाटत नसून दैवी आशीर्वादही निवडून येण्यासाठी आवश्यक असल्याचे वाटत आहे, हे त्यांच्या कृतीवरून दिसून येत आहे.