प्रतिनिधी /सांगे :
सांगे तालुक्मयातील अगदी टोकाला असलेल्या नेत्रावळी येथे कोरोनाने शिरकाव केला असून पोलीस शिपाई म्हणून काम करणारा येथील एक युवक पॉझिटिव्ह निघाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, गेल्या गुरुवारी या पोलिसाची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर तो सुट्टीनिमित्त आपल्या नेत्रावळी येथील घरी आला होता. परंतु घरी विलगीकरणात न राहता तो शुक्रवारी गावात अनेक ठिकाणी फिरल्याची तसेच अनेकांच्या संपर्कात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. इतकेच नव्हे, तर तो आपल्या मित्रांसह खेळण्यासही गेला होता अशी माहिती मिळाली आहे.
शनिवारी सदर युवक डय़ुटीवर गेला असता तेथे त्याच्या चाचणीचा पॉझिटिव्ह आलेला अहवाल मिळाला. ही वार्ता गावात पसरताच एकच खळबळ माजली आहे. त्या युवकाला घरी असताना तापही आला होता अशी माहिती गावातील लोकांकडून मिळाली आहे. या रोगाच्या बाबतीत खबरदारी घेणे गरजेचे असताना सदर युवक गावात फिरून इतर लोकांच्या संपर्कात आल्याने भीती पसरली आहे.
नेत्रावळी परिसरात निर्जंतुकीकरण मोहीम
सदर पोलीस शिपाई फोंडा पोलीस स्थानकात कामाला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच सोमवारी रात्री सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी कुडचडे येथील अग्निशामक दलाच्या स्थानक प्रमुखांना माहिती देऊन नेत्रावळी येथील सदर कोरोनाबाधिताचे घर, तो ज्या ठिकाणी फिरला तो परिसर निर्जंतुक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी अग्निशामक दलाच्या जवानांनी नेत्रावळीतील सर्व परिसर निर्जंतुक केला. पथकाचे प्रमुख शशिकांत नाईक, जवान साईप्रसाद नाईक, फ्रान्सिस्को क्लेमेन्त, कर्मचारी रोहन गावस यांनी ही मोहीम राबविली. याबद्दल गावचे समाजकार्यकर्ते अमित नाईक यांनी समाधान व्यक्त केले आहे.
त्याचबरोबर सांगे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने नेत्रावळीतील रुग्णाचे कुटुंबीय तसेच त्याच्या संपर्कात आलेल्यांच्या मिळून 49 जणांच्या चाचण्या घेतल्या असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. सध्या नेत्रावळी बाजार बंद असून लोकांनी घरातच राहण्यास पसंती दाखविली आहे.