असाध्य आजारी 1-12 वर्षापर्यंतच्या मुलांचे जीवन संपवू शकणार डॉक्टर : पालकांची अनुमती अनिवार्य
वृत्तसंस्था / ऍमस्टरडॅम
नेदरलँडच्या सरकारने गंभीर किंवा असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांचे जीवन संपविण्याचा निर्णय घेण्याची अनुमती डॉक्टरांना दिली आहे. डॉक्टर आता स्वतःच्या पद्धतीने अशा आजारी मुलांचे जीवन संपवू शकणार आहेत. परंतु याकरता त्यांना संबंधित मुलांच्या आईवडिलांची अनुमती घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे या निर्णयानंतर वैद्यकीय क्षेत्रात मृत्यू देण्याच्या मुद्दय़ावरून चर्चा सुरू झाली आहे.
या मुलांना औषधाद्वारे जिवंत ठेवता येत असेल तर त्यांना अशाप्रकारचा मृत्यू का दिला जावा, असा प्रश्न काही संघटनांनी उपस्थित केला आहे. परंतु बहुतांश तज्ञ आणि कायदेतज्ञांनी या नव्या कायद्याबद्दल सहमती दर्शविली आहे. नेदरलँडध्ये असाध्य आजाराने ग्रस्त 1 वर्षापर्यंतच्या मुलांना मृत्यू देण्याची अनुमती आहे.
नेदरलँडचे आरोग्यमंत्री ह्यूगो डी जॉन्ग यांनी यासंबंधीच्या कायद्यात विस्ताराचा प्रस्ताव मांडला होता. जेणेकरून 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना नव्या कायद्यात सामील करता येईल. काही मुले अत्यंत आजारी असतात, त्यांच्यात कुठल्याही प्रकारची सुधारणा होण्याची अपेक्षा नसते. ते अनावश्यक स्वरुपात पीडित होतात. दरवर्षी अशी सुमारे 5 ते 10 मुले प्रभावित होत असतात, असे जॉन्ग यांनी संसदेत बोलताना सांगितले आहे.
जर एखादे मूल असहय़ आणि निराशाजनक वेदनेला तोंड देत असेल तर त्याचे जीवन समाप्त केले जाऊ शकते. यातून वैद्यकीय क्षेत्राला मदत होऊ शकते असेही त्यांनी म्हटले आहे. हा कायदा सध्या संमत झाला आहे. नेदरलँड सरकार वैद्यकीय मदतीने बरे होण्याची अंधुकशी शक्यताही नसलेल्या लोकांना मृत्यू देण्याच्या बाजूने राहिले असल्याचे कायदेतज्ञांनी म्हटले आहे.
अमेरिकेसाठी ठरू शकते समस्या
हा नवा कायदा नेदरलँडसारख्या लहान देशांसाठी योग्य आहे. अशा कायद्यामुळे अमेरिकेसारख्या मोठय़ा देशांवरील दबाव वाढणार आहे. गंभीर आजारी असलेले परंतु स्वतःची सहमती देण्यास असमर्थ असलेल्या लोकांप्रकरणी हा दबाव अधिक असेल. अमेरिका किंवा अन्य मोठे देश नेदरलँडच्या या कायद्याचे अनुकरण करण्याची शक्यता फारच कमी आहे. डच नागरिकांच्या तुलनेत अमेरिकेचे नागरिक स्वतःच्या वैद्यकीय व्यवस्थेवर कमी विश्वास ठेवतात. अमेरिका मोठा देश आहे. अशा देशांमध्ये सर्वांसाठी चांगल्या आरोग्य सुविधा नाहीत. अशा स्थितीत मोठय़ा देशांमध्ये हा कायदा समस्या ठरू शकतो असे उद्गार अमेरिकेच्या न्यूयॉर्क लँगॉग मेडिकल सेंटरमधील प्राध्यापक आर्थर काप्लान यांनी काढले आहेत.
3 युरोपीय देशांमध्ये तरतूद
लक्झेम्बर्ग, बेल्जियम आणि स्वीत्झर्लंड हे देश वैद्यकीय सहाय्य प्राप्त मृत्यूची अनुमती देतात. परंतु प्रत्येक देशात वेगवेगळा कायदा आहे. बेल्जियम एका डॉक्टरच्या मदतीने मुलाचे जीवन समाप्त करण्याची अनुमती देतो. तर लक्झेम्बर्गमध्ये हा कायदा असाध्य आजाराने ग्रस्त प्रौढांपुरती मर्यादित आहे.