प्रतिनिधी/ कराड
भरधाव जीप चालवून विजयनगर (ता. कराड) गावच्या हद्दीत वॅगनर कारला धडक दिलेल्या नेदरलॅंडच्या युवतीवर कराड शहर पोलिसांत रात्री गुन्हा दाखल झाला. पावलीन कोरनेलिया जिसजे (वय 24 रा. कोनिजब्रिजे, देश नेदरलॅंड) असे गुन्हा दाखल झालेल्या युवतीचे नाव आहे. याप्रकरणी नानासो शंकर पवार (रा. नाडे-नवारास्ता ता. पाटण) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, पावलीन जिसजे या युवतीने तिच्या ताब्यातील जीप पाटणकडून कराडकडे भरधाव वेगाने चालवली. रविवारी दुपारी साडेतीन वाजता विजयनगरच्या हद्दीत भरधाव जीपने नानासो पवार यांच्या वॅगनर कारला पाठीमागून जोराची धडक दिली. धडकेत पवार यांच्या कारचे नुकसान झाले असून पवार यांनाही मार लागला आहे. कारमधील त्यांचा कॅमेरा, शुटींग कॅमेराही फुटला आहे. पावलीन जिसजे ही युवती नेमकी कुठून आली याचा तपास पोलीस करत आहेत. पाटणवरून ती दुचाकीवरून नवारस्त्यावर आली. तेथे दुचाकीतील पेट्रोल संपल्याने तीने जीप गाडीची चोरी करून ती कराडच्या दिशेने भरधाव निघाली. विजयनगर येथे जीपवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. यानंतर पोलिसांनी युवतीला ताब्यात घेतले. युवतीकडे कसून चौकशी केली. अजुनही चौकशी सुरू आहे. याप्रकरणी रात्री उशिरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.