भारतीय सैन्यात मिळाले मानद जनरलपद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत सरकारने नेपाळच्या सैन्यप्रमुखांना भारतीय सैन्याच्या हॉनररी जनरलची रँक दिली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी नेपाळचे सैन्यप्रमुख जनरल प्रभु राम शर्मा यांना ही रँक प्रदान केली आहे. प्रभु राम शर्मा हे भारतीय सैन्यप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या आमंत्रणावर 4 दिवसांच्या दौऱयावर आले आहेत.
भारताकडून प्रभु राम शर्मा यांचा गौरव करण्यात आल्याप्रकरणी नेपाळच्या सैन्याकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे. शर्मा यांनी सप्टेंबर महिन्यातच नेपाळ सैन्यप्रमुख पद स्वीकारले आहे. मद्रास विद्यापीठातून त्यांनी युद्ध तसेच रणनीति विषयात एम. फिलची पदवी प्राप्त केली आहे. याचबरोबर त्यांनी भारतात सैन्याच्या तांत्रिक अधिकारीचे प्रशिक्षण मिळविले आहे. 1984 मध्ये प्रभु राम शर्मा यांनी नेपाळ सैन्यात सेकंड लेफ्टनंट म्हणून प्रवेश केला होता.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतीय सैन्यप्रमुख जनरल नरवणे यांना नेपाळ दौऱयादरम्यान राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी नेपाळ सैन्यातील मानद जनरल पद प्रदान केले होते. दशकांपासून दोन्ही देशांचे सैन्य परस्परांचा अशाचप्रकारे सन्मान करत आले आहे.