ऑनलाईन टीम / काठमांडू :
ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या आणि भारतात सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या ‘कोविशिल्ड’ लसीच्या वापराला नेपाळ सरकारने मान्यता दिली आहे.
अलीकडच्या काळात भारत आणि नेपाळ संबंधांमध्ये तणाव असतानाही नेपाळने मित्रराष्ट्र असलेल्या चीनच्या लसीला परवानगी न देता भारताच्या लसीला परवानगी दिली. दोन्ही देशांच्या संबंधांसाठी आणि क्षमतेसाठी ही चांगली बाब आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधून 1.20 कोटी लसींच्या डोसची मागणी करण्यात आली आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याशी झालेल्या फोन कॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आश्वासन दिले होते की, भारतात कोरोना लस तयार केल्यास नेपाळच्या नागरिकांना प्राधान्याची लस दिली जाईल.
दरम्यान, नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ज्ञवाली सध्या भारत दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशात ‘कोविशिल्ड’ खरेदीचा करार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.