जगभरात 2,58,962 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू : इराणमध्ये बाधितांची संख्या लाखापेक्षा अधिक
जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग आतापर्यंत 37,47,313 जणांना झाला आहे. तर 2 लाख 58 हजार 962 जणांचा मृत्यू झाले आहे. तसेच 12 लाख 50 हजार 602 रुग्णांना कोरोना संसर्गावर मात करण्यास यश मिळाले आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळाने देशात 18 मेपर्यंत टाळेबंदी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळमध्ये कोरोनामुळे अद्याप एकाचाही मृत्यू झालेला नाही. तर इराणमध्ये बाधितांची संख्या 1 लाखापलिकडे पोहोचली असून 6,418 जणांचा बळी गेला आहे.
न्यूयॉर्कमध्ये 25 हजारांहून अधिक बळी
अमेरिकेतील न्यूयॉर्क प्रांतात आतापर्यंत 25 हजार 204 जणांचा बळी गेला आहे. प्रांतात 3 लाख 30 हजार 139 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एका नर्सिंग होममध्येच 4,813 जणांचा मृत्यू झाला आहे. व्हाइट हाउस कोरोना टास्क फोर्स आता संपुष्टात आणला जाणार असल्याची घोषणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेत प्रतिदिन 20 हजार रुग्ण सापडत असून 1 हजारापेक्षा अधिक जणांचा मृत्यू होत आहे. अमेरिकेत आता 12,38,052 जण बाधित असून 72,284 जणांचा बळी गेला आहे.
ब्रिटनमध्ये दिवसात 693 मृत्यू
ब्रिटनमध्ये एका दिवसात 693 जणांचा मृत्यू झाला असून 4,406 नवे रुग्ण सापडले आहेत. ब्रिटनमधील बाधितांचा एकूण आकडा आता 1,94,990 वर पोहोचला आहे. ‘प्रोफेसर लॉकडाउन’ या नावाने प्रसिद्ध प्राध्यापक नील फर्ग्यूसन यांनी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजीनामा दिला आहे. नील हे ब्रिटन सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सल्ल्यानुसारच पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी 23 मार्च रोजी देशात टाळेबंदीची घोषणा केली होती.
.
चीनमध्ये दोन नवे बाधित
चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने देशात महामारीचे दोन नवे बाधित सापडल्याची माहिती दिली आहे. चीनमधील एकूण बाधितांचा आकडा आता 82 हजार 883 वर पोहोचला आहे. दोन्ही नवे रुग्ण शांक्सी प्रांतातील आहेत. देशाबाहेरून आलेल्या एकूण 1400 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 278 जणांवर उपचार सुरू असून यातील 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. देशाबाहेरून आलेल्या कुठल्याच नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.
पाकिस्तानात दिवसात 40 मृत्यू
पाकिस्तानात दिवसभरात कोरोनामुळे 40 जणांचा बळी गेला आहे. प्रतिदिन बळींमध्ये हा आकडा सर्वाधिक ठरला आहे. आरोग्य विभागाने 1,049 नव्या रुग्णांची पुष्टी दिली आहे. देशात आता 22 हजार 550 बाधित असून 526 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी देशात 1,315 नवे रुग्ण सापडले होते. खालावणारी अर्थव्यवस्था तसेच कामगारांना मदत करण्यासाठी निर्बंधांमध्ये सूट देण्याची योजना असल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानात 9 मेपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.
अर्थव्यवस्थेसंबंधी समिती स्थापन करणार
कोरोना टास्क फोर्सच्या जागी अर्थव्यवस्था खुली करणाऱया समितीची स्थापना व्हाइट हाउस करणार आहे. उपाध्यक्ष माइक पेन्स आणि टास्क फोर्सने अत्यंत चांगले काम केले आहे. सुरक्षित अर्थव्यवस्थेसाठी आम्हाला एक स्वतंत्र समूह तयार करावा लागणार आहे. पेन्स यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सने आरोग्यसंबंधी मुद्दय़ांवर देशाचे प्रभावी मार्गदर्शन चालविले आहे. अर्थव्यवस्था पुन्हा खुली केल्यावर बळींचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे ट्रम्प म्हणाले.
रशियात संसर्गाला वेग
रशियात सलग चौथ्या दिवशी 10 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. मंगळवारच्या दिवशी देशात 10,559 रुग्ण सापडले आहेत. तर रशियातील एकूण बाधितांची संख्या आता 1,65,929 वर पोहोचली आहे. तर 1,537 जणांचा मृत्यू झाला असून 21 हजार 327 रुग्णांनी कोरोनावर मात मिळविली आहे. मागील काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत वेगाने वाढत आहे.
दक्षिण कोरियात 2 नवे रुग्ण
दक्षिण कोरियात बुधवारी कोरोनाचे दोन नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील बाधितांची संख्या वाढून 10,806 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागानुसार मंगळवारी तीन नवे रुग्ण आढळून आले होते. बुधवारी सापडलेले दोन्ही रुग्ण विदेशातून दाखल झालेले आहेत. मागील 24 तासांदरम्यान एकाही व्यक्तीला कोरोनामुळे जीव गमवावा लागलेला नाही. देशात आतापर्यंत 255 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9,333 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
न्युझीलंडमध्ये दोन नवे रुग्ण
न्युझीलंडमध्ये मागील 24 तासांत 2 नवे बाधित सापडले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. न्युझीलंडमध्ये स्वतःच्या सेवांसाठी मायक्रोसॉफ्ट एक डाटा सेंटर स्थापन करणार असून याकरता गुंतवणूक करणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत पूर्ण विश्वास असल्यानेच बहुराष्ट्रीय कंपनी गुंतवणूक करू पाहत आहे. न्युझीलंडमध्ये व्यापाराची संधी खुली असल्याचा हा जगाला संदेश असल्याचे विधान पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी केले आहे.
इटलीत कोरोनाचे 29,315 बळी
इटलीतील मृतांची संख्या 29,315 झाली असून 2 लाख 13 हजार 13 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. अमेरिका आणि ब्रिटननंतर इटलीतच सर्वाधिक बळी गेले आहेत. इटलीच्या नागरी सुरक्षा विभागाचे प्रमुख अँजेलो बोरेली यांनी 24 तासांत 236 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. इटलीत 10 मार्च रोजी लागू करण्यात आलेली टाळेबंदी 3 मेपर्यंत कायम राहणार आहे. तेथील काही दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
इराण : 1323 नवे रुग्ण
इराणमध्ये एका दिवसात 1,323 नवे रुग्ण सापडले असून 63 जणांचा मृत्यू झाला आहे. एक दिवसापूर्वी देशात 74 जणांना जीव गमवावा लागला होता. इराणमधील बाधितांचा आकडा आता 99 हजार 970 वर पोहोचला आहे. सरकारने संसर्गाच्या आधारावर मशिदी पुन्हा खुल्या करण्याची अनुमती प्रदान केली आहे.