ऑनलाईन टीम / काठमांडू :
प्रभू श्रीरामांचा जन्म भारतात नव्हे तर नेपाळमधील माडी या ठिकाणी झाला आहे, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी केले होते. आता ओली यांनी माडी या ठिकाणी भव्य राम मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला असूूून, स्थानिक नेत्यांना त्यांनी यासाठी योजना तयार करण्यास सांगितले आहे.
नेपाळच्या चितवनमधील माडी या ठिकाणी प्रभू रामाचा जन्म झाल्याचा ओली यांचा दावा आहे. त्यामुळे शनिवारी त्यांनी माडीतील अधिकाऱ्यांना बोलावून राम मंदिर बनवण्यासंबंधी योजना तयार करण्यास सांगितले आहे. तसेच माडीचे नाव अयोध्यापुरी करण्यास त्यांनी सांगितले आहे. नगर परिषदेच्या सल्ल्यानुसार नावाच्या बदलाबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
ऐतिहासिक पुराव्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. तसेच अधिकचे पुरावे गोळा करण्यासाठी अयोध्यापुरीमध्ये खोदकाम करण्याचे आदेशही दिले आहेत. अयोध्येपुरीचा ऐतिहासिक आणि धार्मिक क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी जमीन देण्याचे आश्वासनही ओली यांनी दिले आहे. मात्र, माडी येथील स्थानिक लोकांनी या निर्णयाला विरोध दर्शविल्याचे सांगण्यात येते.