वृत्तसंस्था/ मस्कत
आयसीसीच्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सुरू असलेल्या पात्रता स्पर्धेतील शुक्रवारी येथे झालेल्या अ गटातील सामन्यात नेपाळ आणि कॅनडा या संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदवित स्पर्धेत विजयी सलामी दिली.
नेपाळ आणि ओमान यांच्यातील हा सामना कमी धावसंख्येचा झाला. नेपाळ संघाने ओमान संघाला विजयासाठी 117 धावांचे आव्हान दिले. पण नेपाळच्या भेदक गोलंदाजीसमोर ओमानचा डाव 17 षटकात 78 धावांत आटोपला. त्यामुळे नेपाळने हा सामना 39 धावांनी जिंकला. नेपाळ संघातील कमल ऐरीने 15 धावांत 3 तर लामीछने याने 20 धावांत 2 गडी बाद केले. फिरकी गोलंदाज दीपेंद्र ऐरीने 15 धावांत 2 बळी मिळविले.
शुक्रवारी झालेल्या दुसऱया सामन्यात कॅनडाने फिलिपाईन्सचा 118 धावांनी दणदणीत पराभव केला. कॅनडा संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 1 बाद 216 धावा जमविल्या. कॅनडाचा फलंदाज मॅथ्यू स्पूरने 66 चेंडूत नाबाद 108 धावांची खेळी करताना रेयान पठाणसमवेत सलामीच्या गडय़ासाठी 44 चेंडूत 73 धावांची भागीदारी केली. कर्णधार नवनीत धालीवालने 11 चेंडूत 26 धावा झळकविताना 3 षटकार मारले. प्रत्युत्तरादाखल खेळताना फिलिपाईन्सने 20 षटकात 5 बाद 98 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 118 धावांनी गमवावा लागला.