ऑनलाईन टीम / काठमांडू :
नेपाळ कम्युनिस्ट पक्षात मागील काही दिवसांपासून दोन गट पडले आहेत. एका गटाचे नेतृत्व के.पी. शर्मा ओली तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व पुष्पकमल दहल करत आहेत. दहल यांच्या गटाने केंद्रीय समितीची बैठक घेत सत्तारुढ पक्ष नेपाळ कम्युनिस्ट पार्टीच्या अध्यक्षपदावरुन ओली यांना हटवले आहे.
ओली यांनी यापूर्वी पक्षातील आपले नेतृत्त्व मजबूत करण्यासाठी 1199 सदस्यांच्या नव्या समितीची घोषणा केली होती. दरम्यान, मागील चार दिवसांपूर्वी पंतप्रधान ओली यांच्या मंत्रिमंडळाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी संसद बरखास्त केली आहे. तसेच मध्यावधी निवडणुकांचीही घोषणा केली आहे.
ओली यांनी संसदीय मंडळ, केंद्रीय समिती आणि पक्ष सचिवालय येथे बहुमत गमावले आहे. त्यांनी यावर उपाय शोधण्याऐवजी संसद बरखास्त करण्याच्या शिफारशीचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेतला. राष्ट्रपतींनीही संसद बरखास्त करण्याची शिफारस मान्य केली.