राज्य नेमबाजी स्पर्धेचे करासवाडा येथे उद्घाटन, उद्या बक्षीस वितरण
म्हापसा : नेमबाजी क्रीडा प्रकारामुळे भारत देशाचे नाव जगभर अग्रक्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय नेमबाजांनी सर्वच नेमबाजी क्रीडा प्रकारात स्पृहणीय यश संपादन केले आहे. गोव्यातील नेमबाजांनीही राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नेमबाजीमुळे राज्यातील नवोदितांना चमकण्याची संधी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये मिळणार आहे. गोव्यातही अशी स्पर्धा होणार असून नेमबाजांनी भरपूर सराव करावा आणि पदके मिळवावीत, जेणेकरून राज्याचा नावलौकिक होईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक, ज्युरी आणि भारतीय नेमबाजी संघाचे प्रशिक्षक ऍड. मेघश्याम (विक्रम) भांगले यांनी केले.
रायफल शुटिंग असोसिएशन, गोवातर्फे करासवाडा-म्हापसा येथील यश शुटिंग अकादमी आणि मांदे येथील यश शुटिंग हबमध्ये तीन दिवस राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आज (बुधवारी) करासवाडा येथे ऍड. भांगले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष किशोर शेट मांदेकर, यश शुटिंग अकामदीचे अध्यक्ष योगेश्वर पाडलोसकर, आंतरराष्ट्रीय नेमबाज सौ. भाग्यश्री पाडलोसकर, यश पाडलोसकर, राष्ट्रीय नेमबाज अतुल नाखरे उपस्थित हाते.
किशोर शेट मांदेकर यांनी नेमबाजी क्रीडाप्रकार आणि पिस्तुल, रायफल हाताळणी यावर मार्गदर्शन केले. ही स्पर्धा शुक्रवार 5 मार्चपर्यंत चालणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी मांदे येथे बक्षीस वितरण आणि प्रशस्तीपत्रे वितरित केली जाणार आहेत.