वृत्तसंस्था/नवी दिल्ली
2021 साली होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारताच्या संभाव्य नेमबाजाकरता दोन महिन्यांच्या नेमबाजी प्रशिक्षण शिबिराला गुरूवारी भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाने (साई) आपली अधिकृत मान्यता दिली आहे. सदर राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षण शिबीर 15 ऑक्टोबर ते 14 डिसेंबर दरम्यान घेतले जाणार आहे.
कोरोना महामारी समस्येमुळे यापूर्वी दोनवेळा राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षण शिबीर लांबणीवर टाकण्यात आले होते. अखिल भारतीय रायफल संघटनेकडून या शिबिराला होकार मिळाला असला तरी साईकडून अधिकृत मान्यतेची जरूरी असते. सदर शिबीर येथील डॉ. कर्नी सिंग नेमबाजी संकुलात घेतले जाणार असून या शिबिरामध्ये 18 पुरूष आणि 14 महिला असे एकूण 32 नेमबाज सहभागी होणार आहेत. या शिबिरावेळी 8 प्रशिक्षक, 3 विदेशी प्रशिक्षक आणि 2 साहाय्यक प्रशिक्षक यांचा सहभाग राहील. टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेले भारताचे 15 नेमबाज या शिबिरात दाखल होणार असून या शिबिराकरिता एकूण 1.43 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. 2018 साली विश्व नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारी भारताची महिला नेमबाज अंजुम मोदगीलने टोकियो ऑलिंपिकसाठी आपली पात्रता यापूर्वीच सिद्ध केली आहे. ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी सरावाची नितांत गरज नेमबाजांना असल्याने सदर शिबीर सुरू करण्याच्या निर्णयाचे तिने स्वागत केले आहे.