वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशामध्ये कोरोना परिस्थितीमध्ये वारंवार बदल होत असतानाही अखिल भारतीय नेमबाजी फेडरेशनतर्फे देशातील अव्वल नेमबाजांसाठी येथे सराव शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला असून आता सराव शिबिराच्या दुसऱया टप्प्याला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. या दुसऱया टप्प्यातील सराव शिबिरामध्ये विदेशी नेमबाज प्रशिक्षक सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत.
राष्ट्रीय नेमबाजी सराव शिबिराचा पहिला टप्पा दीपावली सणापूर्वीच पूर्ण झाला. या शिबिरात दाखल झालेल्या नेमबाजांना दीपावली सणासाठी विश्रांती देण्यात आली होती. आता हे नेमबाज पुन्हा शिबिरात दाखल होत आहेत. विदेशी नेमबाज प्रशिक्षक पॅव्हेल स्मिनोव्ह आणि ओलेग मिखालोव्ह या शिबिरात दाखल होणार आहेत. सदर शिबिर दिल्लीतील डॉ. कर्नीसिंग नेमबाजी संकुलामध्ये सुरु आहे. नेमबाज प्रशिक्षक पॅव्हेल आणि ओलेग यांचे भारतात आगमन झाले असून त्यांच्यासाठी अखिल भारतीय रायफल संघटनेतर्फे खास व्यवस्था करण्यात आली आहे. ओलेग बुधवारी तर पॅव्हेल 28 नोव्हेंबर रोजी या शिबिरात दाखल होणार आहेत. आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनतर्फे मोरोक्को येथे 28 जानेवारीला शॉट गन ग्रां प्रि नेमबाजी स्पर्धा आयोजित केली आहे. तर 2021 सालातील पहिल्या विश्व चषक नेमबाजी स्पर्धेचे यजमानपद भारत भूषविणार असून ही स्पर्धा दिल्लीमध्ये 18 ते 29 मार्च दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत रायफल, पिस्तूल, आणि शॉटगन या विविध प्रकारांचा समावेश आहे.