बिबट्याचे अस्तित्व केले मान्य
कासेगाव / वार्ताहर
वाळवा तालुक्यातील कापुसखेडहून नेर्ले येथे पाहुण्यांकडे आलेल्या भावंडावर गुरुवारी रात्री नर्लेहून कापुसखेडकडे परतत असताना बिबट्याने हल्याचा प्रयत्न केला. यावेळी मोटारसायकल स्वार अनिकेत याने प्रसंगावधान राखून गाडीचा वेग वाढवला त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या घटनेची दखल घेत वनपाल सुरेश चरापले व वनरक्षक दिपाली सागांवकर यांनी बिबट्याच्या हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी कापुसखेड येथील अनिकेत पाटील तसेच कापूसखेडच्या सरपंच मंदा धुमाळे, उपसरपंच बाबासाहेब पाटील व सदर रस्त्यावरून ये – जा करणारे वाटसरू यांची भेट घेऊन घटनास्थळाची प्रत्यक्ष पहाणी केली. कदम वस्ती, तीन आंबा याठिकाणी मोठा ऊस, झाडे-झुडपे, पिण्यासाठी पाणी, शिकार करून सहज फस्त करता येणारे बिबट्याचे आवडते खाद्य म्हणजे गावठी कुत्रे असल्यामुळे या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे वनपाल सुरेश चरापले यांनी मान्य केले याआधी देखील याठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आल्याचे सांगितले.
बिबट्या शक्यतो मनुष्यावर हल्ला करत नाही. परंतु बिबट्या रस्ता ओलांडताना अचानक गाडी समोर आल्यास स्वतःच्या बचावासाठी तो प्रतीहल्ला करू शकतो. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी. गाडीजी लाईट कमी असल्यास अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रवास करू नये किंवा केल्यास प्रवासा दरम्यान सतर्कता बाळगावी. गावमद्ये याबाबत दवंडी देण्यात यावी अशा सूचना त्यांनी कापुसखेड ग्रामपंचायतीस दिल्या आहेत.