प्रतिनिधी / नेसरी
येथील नावलगी वसाहत नजिक शेतवडीत काजूच्या बागेत काम करणार्या दत्तात्रय नावलगी यांना सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान अनोळखी तरस सदृश प्राण्याचे दर्शन झाले होते. मात्र लांबून त्यांना हा प्राणी नेमका कोणता असल्याचे कळले नाही. त्यामुळे त्यानंतर गावात बिबट्या आला असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र मंगळवारी सकाळी वनविभागाच्या वतीने त्या परिसरातील पाहणी करत शेतवडीतील त्या प्राण्याच्या पायाचे ठसे बघता तो तरस सदृश्य प्राणी असल्याचा निर्वाळा वनविभाच्या वतीने केल्याने चर्चांना पूर्ण विराम मिळाला. कोलेकर महाविद्यालयाच्या काजूच्या बागेतून मारीयान रेगे यांच्या ऊसाच्या शेतामधून नावलगी वसाहत नजिक शेतवडीतून तळेवाडी गावच्या हद्दीतील जंगल भागात तो प्राणी गेल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले. त्यामुळे हा नेमका कुठला प्राणी यावर गावात चर्चेला उधाण आले होते.
तीन- चार वर्षा पूर्वी याच परिसरामध्ये टस्कर हत्तीचे दर्शन नेसरीकरांना झाले होते. तरस सदृश प्राण्याचे दर्शन झाल्याची बातमी समजताच आजरा वन परीक्षेत्राचे वन क्षेत्रपाळ डॉ. एस. के. लाड यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज परीमंडळाचे वनरक्षक आर. आर. नाईक, वनसेवक विलास पाटील यांनी प्राणी ज्या वाटेने गेला त्या वाटेची पाहणी करून ठशांचा अभ्यास केला असता तो प्राणी तरस आलेल्याची शक्यता वर्तवली. नावलगी वसाहतमध्ये तरस सदृश प्राण्याचे दर्शन झाल्याची माहिती कळताच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात कोरोना संसर्गजन्य आजार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र जमाव, संचार बंदी आदेश लागू असल्यामुळे शेती कांमापासून शेतकरी वर्ग काहीसा वंचित आहे शिवाय रस्त्यावरील वर्दळ वाहनांचा आवाज बंद आहे. त्यामुळे जंगली पशु, पक्षी, प्राणी मुक्त पणे वावरतानाचे चित्र आहे. नेसरी परिसरामध्ये तारेवाडी, अर्जुनवाडी, हडलगे गावामध्ये गव्यांचे दर्शन नित्याचाच विषय असतानाच ग्रामीण भागामध्ये विविध जंगली प्राण्यांचे दर्शनाचे प्रकार वाढले आहेत. या तरस सदृश प्राण्याचे दर्शन कुतुहलाचा विषय झाला आहे.