हैदराबाद / वृत्तसंस्था
कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’ची निर्मिती करणाऱया हैदराबादमधील भारत बायटेकने निर्मिती केलेल्या नेसल व्हॅक्सिनची चाचणी आता सुरू झाली आहे. बुधवारपासून हैदराबादमध्ये दहा जणांना ही लस देण्यात आली असून अन्य केंद्रावरही लवकरच ही लस प्रात्यक्षिक म्हणून दिली जाणार आहे. ‘भारत बायोटेक’ निर्मित लसीच्या चाचणीची सर्व प्रकिया पूर्ण झाली असून पटना, चेन्नई, नागपूर आणि हैदराबाद या शहरांची निवड करण्यात आली आहे. ‘सेंट्रल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडिया’च्या देखरेखीखाली निवडक स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी होणार आहे.
‘भारत बायोटेक’ने आता नाकाद्वारे दिली जाणारी (नेसल) लस तयार करून तिच्या अनुमतीसाठी प्रयत्न चालवले आहेत. सेंट्रल ड्रग्ज कंट्रोल ऑर्गनायझेशनने (सीडीएससीओ) फेब्रुवारी महिन्यामध्ये या लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणी करण्यास अनुमती दिली होती. ही लस इंटरनेझल म्हणजेच नाकावाटे दिली जाणार आहे. या लसीची सकारात्मक परिणामकारकता सिद्ध झाल्यास ते भारताच्या लसनिर्मिती मोहिमेतील ते एक मोठे यश ठरणार आहे.
सध्याच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या इंट्रामस्कुलर म्हणजेच पेशींमध्ये दिल्या जाणाऱया लसी मोहिमेमध्ये वापरल्या जात आहेत. त्यानंतर आता नाकावाटे देण्यात येणारी लस पूर्णपणे वेगळी असून या लसीमुळे लसीकरण आणखीन स्वस्त होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.