प्रतिनिधी/ राय
गोव्यातील युवकांना व्यसनाधीन करण्याचा प्रयत्न मायणा -कुडतरी पोलिसांनी काही प्रमाणात फोल ठरविवह. नेसाय औद्योगिक वसाहतीतील एका जागी सोमवारी धाड घालून सुमारे 24,00,000 रुपये किंमतीचे अवैध तंबाखु पदार्थ जप्त केले. तंबाखूच्या या पदार्थासंबंधी अटक केलेल्या दोन संशयित आरोपींकडे कोणतीच कागदपत्रे नव्हती.
पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाड घालण्यात आली.
24 लाख रुपये किंमतीचा हा तंबाखु पदार्थ ज्या वाहनातून आणण्यात आला होता ते वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे.
विविध कायद्याच्या विविध कलमाखाली पोलिसांनी हा माल जप्त केला आणि संशयित आरोपींना अटक केली. उपनिरीक्षक दीपेश शेटकर यांनी या प्रकरणी मायणा कुडतरी पोलीस स्थानकात तक्रार केली. या तक्रारीवर आधारुन पोलिसांनी 24 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमाराला ही धाड घातली.
शंशयित आरोपी गोव्यातील विविध दुकानात तंबाखूचा हा माल पुरवठा करणार होता. त्याआधीच पोलिसांनी ही कारवाई केली.
या प्रकरणी पोलिसांनी रुमडामळ येथील 31 वर्षीय संज्यू बाबू गौडर, रामनगरी मुगाळी येथील दिनेश लक्ष्मण गाडबोले या 22 वर्षीय संशयित आरोपींना अटक केली आहे. वरष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकेश हडफडकर याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.